esakal | महाराष्ट्राला ऑक्सिजनची गरज, IIT मुंबईने करुन दाखवलं

बोलून बातमी शोधा

oxygen
महाराष्ट्राला ऑक्सिजनची गरज, IIT मुंबईने करुन दाखवलं
sakal_logo
By
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी आयआयटी मुंबईने पुढाकार घेतला असून त्याच पार्श्वभूमीवर पीएसए (प्रेशर स्विंग एबसॉरप्शन) नायट्रोजन युनिटचे पीएसए ऑक्सिजन युनिट मध्ये रूपांतर करणारी यंत्रणा येथील टीमकडून तयार करण्यात आली आहे.

यामध्ये करण्यात आलेल्या प्राथमिक चाचण्यांमध्ये या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. 3.5एटीएम इतक्या दाबाने 93 ते 96 टक्के शुद्धतेच्या स्तरासह ऑक्सिजनची निर्मिती शक्य होणार आहे. या ऑक्सिजन वायूचा उपयोग कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा अविरत पुरवठा करण्यासाठी केला जाऊ शकतो, असा विश्वास आयआयटी मुंबईतील या टीमकडून व्यक्त करण्यात आला आहे.

ऑक्सिजन निर्मितीसाठी करण्यात आलेली ही यशस्वी चाचणी असून झालेला हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प एका सामान्य तांत्रिक क्लुप्तीवर आधारित आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या नायट्रोजन संयंत्र रचनेची योग्य जुळवाजुळव आणि कार्बन ते झोलाइटमधील रेण्वीय चाळणी बदलून आँक्सिजनची निर्मीती करण्यात आली आहे, असे आयआयटी मुंबईचे अधिष्ठाता (संशोधन आणि विकास) प्राध्यापक मिलिंद अत्रे यांनी सांगितले.

हेही वाचा: लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे १,२७४ कोटींचे नुकसान

कच्चा माल म्हणून वातावरणातील हवा शोषून घेणारी अशी काही नायट्रोजन संयंत्रे देशातील विविध औद्योगिक युनिटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे हे प्रत्येक औद्योगिक युनिट आपल्या नायट्रोजन संयंत्राचे ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या संयंत्रात रूपांतर करू शकेल त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत हे रूपांतरण आपल्यासाठी फायदेशीर ठरणार असेही अत्रे म्हणाले.

हेही वाचा: लॉकडाउनचा कालावधी वाढवायचा? हायकोर्टाचा सरकारला सवाल

हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प आयआयटी मुंबई, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स आणि पीएसए नायट्रोजन आणि ऑक्सिजन संयंत्र उत्पादक असलेले स्पॅन्टेक इंजिनियर्स, मुंबई यांचा संयुक्त प्रयत्न आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणून प्रमाणित करण्याच्या दृष्टीने, आयआयटीच्या रेफ्रिजरेशन अ‍ॅन्ड क्रायोजेनिक्स प्रयोगशाळेत पीएसए नायट्रोजन संयंत्राचे ऑक्सिजन संयंत्रात रूपांतर केले आहे. या पथदर्शी प्रयोगाचा देशभरात फायदा होऊ शकेल तसेच तो देशभरातील विविध औद्योगिक युनिटमध्ये तातडीने लागू करण्यासाठी आयआयटी मुंबई, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स आणि स्पॅन्टेक इंजिनिअर्स यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आली.

या प्रकल्पातील सहयोग आणि भागीदारीबद्दल, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित शर्मा यांच्यासह स्पॅन्टेक इंजिनियर्सचे प्रवर्तक आणि आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी (1970 बॅच) राजेंद्र तहिलियानी, स्पॅन्टेक इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक राज मोहन आणि तळमळीने काम करणारे इतर सदस्य यांचे प्रा. मिलिंद अत्रे यांनी आभार मानले आहेत .