esakal | लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे १,२७४ कोटींचे नुकसान

बोलून बातमी शोधा

mumbai local

लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे १,२७४ कोटींचे नुकसान

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: लोकल सेवेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटले जाते. कोरोनाची साथ येण्याआधी मुंबई लोकलमधून दररोज ८० लाख प्रवासी प्रवास करायचे. पण कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मागच्यावर्षी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. मुंबई लोकलही बंद होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद आहे.

पहिली लाट ओसरल्यानंतर लोकल सुरु करण्यात आल्या होत्या. पण अजूनही पूर्ण क्षमतेने मुंबई लोकल सुरु झालेली नाही. लॉकडाउन, निर्बंध यामुळे मुंबईतील उपनगरीय लोकल वाहतुकीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे आतापर्यंत १,२७४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. "कमी तिकिट दरांमुळे उपनगरीय लोकल सेवा नेहमीच तोट्यात राहिली आहे. लोकल पूर्णपणे बंद झाल्यामुळे उपनगरीय लोकलचा तोटा मोठ्या प्रमाणात वाढला. वर्ष २०२०-२१ मध्ये मध्य रेल्वेचे ६०० कोटी आणि पश्चिम रेल्वेचे ६७४ कोटी रुपयांचे नुकसान झाले" असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी, मात्र मृत्यूदर वाढताच

एक फेब्रुवारी २०२१ पासून महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु केली. पण त्याला वेळेची मर्यादा होती. सर्वसामान्यांना पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी सात पर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते ४ आणि रात्री ९ नंतर प्रवासाची परवानगी होती.

हेही वाचा: 15 मे पर्यंत मुंबईची परिस्थिती नियंत्रणात?

मधल्यावेळेत अत्यावश्यक आणि सरकारी नोकरदारांना प्रवासाची मुभा होती. सर्वप्रथम अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जून २०२० पासून लोकल सुरु झाली. महाराष्ट्र सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत १५ एप्रिलपासून पुन्हा सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद केला आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे.