ठाण्यात लॉक डाऊनमध्ये 'रात्रीस खेळ चाले', वाचा सिडको परिसरात चाललंय काय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

ठाण्यात रात्रीच्या अंधारात अवैध मद्यविक्री, सिडको परिसरात तळीरामांसह पोलिसांनाही मिळतेय मद्य 

ठाणे : कोरोनाचे रेडझोन असलेल्या भागात मद्यविक्रीला बंदी असतानाही ठाण्यात मात्र, रात्रीच्या अंधारात वाईनशॉपमधून मद्यविक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे, ठाणे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिडको परिसरात असलेल्या या शॉपमधून तळीरामांसोबतच पोलिसही मद्य घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

साधारणतः असा असेल लॉकडाऊन 4 चा टप्पा, जाणून घ्या नवा फॉर्म्युला...

ठाण्यात मागील अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमुळे वाईनशॉप व बार बंद आहेत. ही संधी साधून अनेकजण अव्वाच्या सव्वा किमतीला मद्य खरेदी करत आहेत. त्यातच मद्यविक्री बंद असताना ठाणे नगर पोलिस ठाणे क्षेत्रातील सिडको परिसरातील वाईन शॉपमधून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या अंधारात मद्यविक्री होत असल्याचे समोर आले आहे. मद्यतस्करीचे व्हिडिओ सोशल मिडियांत व्हायरल झाले असून त्यात काही पोलिसही मद्याची खरेदी करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामराव सोमवंशी यांना संपर्क साधला असता, त्यांनी महत्वाच्या कामात व्यस्त असल्याचे सांगून बोलणे टाळले.

सामनातून सरकारला थेट 'हा' सवाल, जनतेचा धीर सुटणार नाही याचीही काळजी घेण्याचा सल्ला

पोलिसांकडूनच मद्याची खरेदी : 
या वाईनशॉप मालकाने रात्री दुकान उघडून मद्यविक्री केली आहे. पहिल्यांदा चक्क पोलिसच ग्राहक होते आणि दुसऱ्यावेळी एका नागरिकाला मद्य देण्यात आले. हा सर्व प्रकार काही नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये बंदिस्त करुन व्हायरल केल्याने पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभाग संशयाच्या भोवऱ्यात : 
दरम्यान, ठाणे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घाऊक मार्केटमध्ये बंदी असतानाही राजरोसपणे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकले जात आहेत. याबाबत अन्न व औषध प्रशासनानेही कानाडोळा केला. त्यानंतर, आता मद्य तस्करीचा भांडाफोड झाल्याने पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

illegal sale of liquor to police and commen people done in cidco area of thane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal sale of liquor to police and commen people done in cidco area of thane