
शुद्ध पाण्याने मुंबईकर आनंदी
मुंबई - राज्य सरकारने १ मेपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील `सर्वांना पाणी` धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाने मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र नसणाऱ्या ५५ हजार इमारतींना पाणी मिळणार आहे; तर अनधिकृत झोपड्या आणि वसाहतींमधील २० लाख मुंबईकरांची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे. त्यांना कायदेशीर, नियमित आणि स्वच्छ-शुद्ध पाणी मिळणार असल्याने मुंबईकरांमधून आनंद व्यक्त होत आहे.
सर्वांसाठी पाणी धोरणांतर्गत झोपडपट्टीतील रहिवासी, अनधिकृत बिगर झोपडपट्टी निवासी बांधकामे, गावठाण आणि कोळीवाड्यातील निवासी बांधकामे यांना आता नळ जोडणी व पाणी मिळणार आहे. अनधिकृत झोपड्या आणि बांधकामांना उभ्या जलजोडणीद्वारे पाणी नियामक अटींनुसार देण्यात येईल. झोपडपट्टीतील रहिवाशांच्या समूहात ज्या ठिकाणी १५ हून अधिक झोपड्या आहेत, तेथेच प्राधान्याने उभ्या नळ जोडण्या देण्यात येतील. झोपडपट्टी रहिवाशांना मंडळ स्थापन करून जोडण्या देण्यात येतील, असेही या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम ९२ अन्वये पाण्याची जोडणी मंजूर केली जाईल. कोणतीही जलजोडणी देताना, करनिर्धारण व संकलन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे मुंबईतील अनधिकृत झोपडपट्ट्यांतील नागरिकांना नळ जोडणी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
... यांना मिळणार जोडणी
महापालिका आयुक्त वा त्यांनी याबाबतीत अधिकार दिलेला कोणत्याही अधिकाऱ्याला अशी जोडणी, संख्येने १५ पेक्षा कमी व ५ पेक्षा अधिक रहिवाश्यांच्या मंडळास देता येईल. मात्र ते अशा जोडणीची गरज, आवश्यक त्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची मंडळाची तयारी आणि पाणी पुरवठ्याची उपलब्धता यांवर अवलंबून राहिल.
खासगी जमिनीवरील अनधिकृत झोपडपट्ट्यांना व सीआरझेड भागात असलेल्या झोपड्यांना सार्वजनिक जलजोडणी उपलब्ध करून दिली जाईल. कोणत्याही शासकीय, महारपालिकेच्या प्रकल्पबाधित झोपड्यांना संबंधित प्राधिकरणाकडून त्या निष्कासित करेपर्यंत पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल.
केंद्र सरकार, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, बीपीटी, जंगल आणि खारफुटी आदींच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित सहाय्यक अभियंता यांच्याद्वारे प्राधिकरणाला सूचना जारी होईल. ही सूचना मिळाल्यापासून ३ आठवड्यांच्या आत आक्षेप प्राप्त न झाल्यास जलजोडणी मंजूर केली जाईल.
गावठाणांचाही विचार
मुंबईत गावठाणांचाही मोठा बिकट प्रश्न आहे. किचकट कायदेशीर बाबींमुळे अनेक गावठाणांमध्ये पाण्याची समस्या जाणवते. सर्वांसाठी पाणी धोरणात याबाबतही विचार करण्यात आला आहे. गावठाण आणि कोळीवाडा परिसरातील निवासी सदनिकांना मानकानुसार जलमापकयुक्त जलजोडणी जमिनीलगत टाकीमध्ये दिली जाईल. सिमेंट काँक्रीट टाक्या, स्टील टाक्या आणि सिंटेक्स टाक्या यासारख्या इतर साठवण पर्यायाचाही विचार केला जाऊ शकतो, असेही या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे.
Web Title: Implementation Of Policy Water For All Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..