esakal | १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणात राज्यात मुंबईत पहिल्या नंबरवर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccination

१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणात राज्यात मुंबई पहिल्या नंबरवर

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड: सकाळ वृत्तसेवा

मुंबई: ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या लसीकरणामध्ये कोल्हापूर (kolhapur vaccination) जिल्हा प्रथम क्रमांकावर असताना 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणात मागे पडल्याचे चित्र आहे. तर, 18 ते 44 वयोगटातील लसीकरणात राज्यात मुंबई (Mumbai vaccination) जिल्हा पहिल्या क्रमांकावर असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. या वयोगटातील 33.8 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. (In 18 to 44 age group vaccination mumbai is leading in state)

दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 25 टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. तर, 18 वर्षांवरील जे डोस घेण्यास पात्र होते, अशांचे 47 टक्के लसीकरण केले गेले आहे. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे वेगाने सुरू झालेल्या लसीकरणाच्या मोहिमेत खंड पडेल अशी भीती पालिकेला वाटत आहे.

हेही वाचा: होणाऱ्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप, मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

पालिकेच्या आकडेवारीनुसार, 45 लाख नागरिकांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही उपलब्ध लसींचा पहिला डोस घेतला आहे, त्यापैकी 11.50 लाख लाभार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे, सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी वाढत्या लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेच्या संसर्गाला थोपवून लावता येईल असा विश्वास निर्माण केला आहे.  मुंबईत 18 ते 44 वयोगटातील 57.7 लाख लोकसंख्या असून 19.5 लाख म्हणजेच 33.8 टक्के लसीकरण 3 जुलै पर्यंत झाले आहे. यातील 50 टक्के लसीकरण खासगी रुग्णालयात झाले. मुंबईला गेल्या सोमवार पर्यंत 90 हजारांचा लस साठा मिळाला असून बुधवारी तो संपला.

हेही वाचा: "हिंदूंच्या सणांना नियम, अटी घालणारी जनाबसेना म्हणजे..."

18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणात कोल्हापूर पिछाडीवर - 

कोल्हापूर जिल्ह्यात 45 वयोगटातील लोकसंख्या 12.73 लाख एवढी आहे. यातील 8.8 लाख जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 18 ते 44 वयोगटातील 18.85 लाख नागरिक असून यातील 31 हजार 332 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ही टक्केवारी निव्वळ 1.66 टक्के एवढीच आहे. मात्र, 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात करताना लसीचा तुटवडा भासला असे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोल्हापूरातील खासगी रुग्णालयांकडून काही तरुणांना लस देण्यात आली.

जून महिन्यात महाराष्ट्र राज्याला 59 लाख डोस मिळाले होते. यातील 49.8 लाख कोविशिल्ड आणि नऊ लाखांहून अधिक कोव्हॅक्सिन होते.  तर, मे महिन्यात राज्याला 40 लाख लसींचे डोस मिळाले. यातील 33.06 लाख लस या कोविशील्ड तर 6.99 लाख लस कोव्हॅक्सिन लस होत्या. आता जुलै महिन्यात 1 कोटी लस मिळणे अपेक्षित आहे. 

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईत एकूण 401 लसीकरण केंद्रे आहेत. दररोज, नवीन केंद्रांची भर पडते. ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्रे देखील सुरू केली आहेत जिथे लोकांना वाहनाच्या बाहेर न पडता कोरोनाव्हायरसविरोधातील लस घेता येऊ शकते. झोपडपट्टीवासीयांच्या दारापर्यंत लसीकरणाचा उपक्रम नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही रोजच्या लसीकरणाची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.

लसअभावी गाठता येत नाही लक्ष्य -

दररोज 1-1.50 लाख नागरिकांना लसीकरण करण्याची क्षमता असूनही पालिकेला लसीअभावी आपले लक्ष्य पूर्ण करता येत नाही. त्यामुळे, तिसऱ्या लाटेपूर्वी पालिकेला किमान लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.

18 ते 44 वयोगटातील लसीकरण :

मुंबई 33.8 टक्के

पुणे 28.1 टक्के

ठाणे 14.6 टक्के

भंडारा 14.2 टक्के

गोंदिया 13.8 टक्के

इतर जिल्ह्यात 10 टक्क्यांहून कमी लसीकरण झाले आहे. कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बुलढाणा, आणि अमरावती या जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून कमी लसीकरण झाल्याची नोंद आहे.

loading image