esakal | मुंबईत प्रतिडझन अंड्यांचा दर ८० रुपये

बोलून बातमी शोधा

Egg
मुंबईत प्रतिडझन अंड्यांचा दर ८० रुपये
sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कोरोना संसर्ग वाढल्याने अंड्यांची मागणी वाढली आहे. परिणामी अंड्यांचा दर डझनामागे 10 ते 12 रुपयांनी वाढला असून घाऊक बाजारात 4 रुपये 65 पैश्यांना मिळणारे अंडे किरकोळ बाजारात 7 रुपयांपर्यंत महागले आहे. मुंबईला दिवसाला 1 कोटी 80 हजारांच्या वर अंड्यांचा पुरवठा होत होता. त्यात आता वाढ होऊन 2 कोटी 25 लाखांवर पोहोचला आहे. साधारणता मार्च ते मे च्या दरम्यान अंड्यांची मागणी ही कमी होते. त्यामुळे अंड्यांचा दर प्रति अंड 5 रूपयांपर्यंत खाली घसरतो. यावर्षी मात्र नेमके उलटे झाले असून भर उन्हाळ्यात अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. कोरोना संसर्ग वाढल्याने पौष्टिक आहार घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पौष्टिक आहार म्हणून अंड्याकडे बघितले जात असून अंड्यांची मागणी वाढली असल्याचे पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अजित रानडे यांनी सांगितले.

हेही वाचा: 'मूर्खपणा चाललाय', हायकोर्टाकडून महाराष्ट्र सरकारची कानउघडणी

अंड्यांची मागणी वाढल्याने त्याचा परिणाम अंड्यांचा पुरवठा आणि किमतींवर झाला आहे. वाढत्या मागणीमुळे परराज्यातून अंडी मागवण्यात येत असून त्यामुळे आता पुन्हा एकदा अंड्यांचा पुरवठा वाढला आहे. यासह अंड्यांचा दर ही वाढला असून गेल्या महिन्यात किरकोळ बाजारात प्रति अंड 6 रूपये असणारा दर आता 7 रूपयांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या अंडी 80 रूपये डझनने विकली जात आहेत.

हेही वाचा: गर्लफ्रेंडला भेटायचय, कुठला स्टिकर वापरु?

लॉकडाऊनमुळे अनेकांना 'वर्क फ्रॉम होम' काम करावे लागते. ही बैठी जीवनशैली आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. आरोग्‍यदायी जीवनासाठी उत्तमरित्‍या नियोजित व केंद्रित आणि संतुलित पौष्टिक आहार ही काळाची गरज आहे. शारीरिक व मानसिक आरोग्‍य व्‍यक्‍ती सेवन करत असलेल्‍या अन्‍नावर अवलंबून असते. प्रथिने शरीरातील पेशी, स्‍नायू, त्‍वचा, उती व अवयवांच्‍या चांगल्‍या आरोग्‍यासाठी अत्‍यंत उपयुक्‍त आहेत. चिकन व अंडी सारखे प्रथिनेयुक्‍त अन्‍नपदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्‍यामध्‍ये कॅलरींचे कमी प्रमाण असण्‍यासोबत प्रथिने संपन्‍न प्रमाणात असतात असे पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अजित रानडे यांनी सांगितले.

राज्यात साधारणता सव्वा कोटी अंड्याचे उत्पादन होते. मात्र अंड्यांची मागणी वाढल्याने शेजारील गुजरात,मध्यप्रदेश, तेलंगणा या राज्यांतून साधारणता 1 कोटी अंडी दररोज मागवली जात आहेत. कोरोना आणि बर्ड फ्ल्यूच्या अफवांचा पोल्ट्री व्यवसायाला फटका बसला. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी कुक्कुट उत्पादन तुलनेने कमी घेतले. त्यामुळे अंड्यांचे उत्पादन ही कमी झाले असून मागणी मात्र वाढली आहे.