esakal | मुंबईच्या राजकारणातील जायंट किलर एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन

बोलून बातमी शोधा

एकनाथ गायकवाड
मुंबईच्या राजकारणातील जायंट किलर एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडिल होते. मनमिळावू स्वभावाच्या एकनाथ गायकवाड यांना माणसे जोडण्याची कला अवगत होती. काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम करताना त्यांनी दांडगा जनसंपर्क निर्माण केला. १४ व्या आणि १५ व्या लोकसभेचे ते सदस्य होते. लोकसभेमध्ये ते दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करायचे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला. त्याआधी २००४ ते २०१४ अशी दहावर्ष एकनाथ गायकवाड लोकसभेमध्ये खासदार होते. धारावी मतदारसंघातून त्यांनी तीन वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली. महाराष्ट्र सरकारमध्ये दोनवेळा त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवले.

हेही वाचा: मुंबईत मोफत मिळणार ऑक्सिजन, कसं ते समजून घ्या...

२००४ मध्ये ते दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून जायंट किलर ठरले होते. एकनाथ गायकवाड यांनी त्यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. खरंतर मनोहर जोशी सहज विजयी होतील, असा त्यावेळी अंदाज होता. पण त्यावेळी मुंबईच्या राजकारणातील हा सर्वात मोठा उलटफेर होता. शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत दुपारी साडे तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

एकनाथ गायकवाड यांनी लोकसभेचे तसेच राज्य विधानसभेचे सदस्य म्हणून मुंबईच्या आणि विशेषतः धारावीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. मितभाषी असलेले एकनाथ गायकवाड नेहमी जनसामान्यांमध्ये राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे जनसामान्यांचा कैवारी गेला आहे.

- भगतसिंह कोश्यारी - राज्यपाल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन दुःखदायक आहे. वंचित व उपेक्षित समाजांचे शैक्षणिक उत्थान व सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्यांनी अथकपणे आयुष्यभर कार्य केले.

शरद पवार - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात एकनाथ गायकवाड यांचे महत्वाचे योगदान आहे. ते कित्येत वर्षापासून समाजासाठी अविरतपणे झटत आहेत. त्यांच्या निधनाबद्दल खूप दु;ख झाले.

- मल्लिकार्जुन खर्गे, विरोधीपक्ष नेता, राज्यसभा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले. मुंबईतील अतिशय लोकप्रिय नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांच्या निधनामुळे धर्मनिरपेक्ष विचारांची पाठराखण करणारा एक ज्येष्ठ नेता काळाच्या पडद्याआड गेला. या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.

- सुप्रिया सुळे - खासदार

एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. एकनाथ गायकवाड यांच्यावर काळाने कोरोनाच्या रूपात घातलेला घाला काँग्रेस पक्ष आणि समाजासाठी मोठी हानी आहे.

- अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम मंत्री

सर्वसामान्यांसाठी झटणारे एक अनुभवी, निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.

- नाना पटोले - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांच्या निधनाची बातमी समजली. या दुःखद प्रसंगी आम्ही गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

चंद्रकांत पाटील - भाजपा नेते