esakal | कोपर्डी बलात्कार प्रकरणी सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाची असमर्थता
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

कोपर्डी बलात्कार प्रकरणी सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाची असमर्थता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणार्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी आरोपींनी केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे आता अन्य खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या खटल्यातील आरोपींच्या याचिकेवरील सुनावणी मागील कित्येक वर्षे रखडली आहे. राज्य सरकारने या खटल्यातील तीनही दोषी आरोपींच्या अपील याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी सप्टेंबरमध्ये उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार आज न्या साधना जाधव आणि न्या प्रुथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे याचिकेची सुनावणी निश्चित केली होती. मात्र सोमवारी खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी असमर्थता व्व्यक्त केली. त्यामुळे आता याचिकांवर न्या एस एस शिंदे आणि न्या व्ही जी बिश्त यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पाच वर्षापूर्वी कोपर्डीमधील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी आरोपी जितेंद्र उर्फ बाबुलाल शिंदे (25), संतोष भवाळ (30) आणि नितीन भैलुमे (26) यांना अटक केली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने तिनही आरोपींना दोषी ठरवून फाशीची सजा सुनावली आहे. या निकालाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात आपील याचिका केली आहे. आरोपी भैलुमे याने औरंगाबाद खंडपीठापुढे असलेला हा खटला मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने देखील फाशीची सजा कायम करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाने राज्य सरकारची आणि आरोपींच्या याचिकेवर मुंबईमध्ये सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

कोविडच्या निर्बधांमुळे या याचिकांवर अद्याप सुनावणी झाली नव्हती. आज यावर सुनावणी घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र आता संबंधित खंडपीठाने सुनावणीस नकार दिल्यामुळे आता अन्य खंडपीठापुढे सुनावणी घेतली जाईल.

कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. यामुळे एकत्रित झालेल्या सकल मराठा समाजाने राज्यात मूक मोर्चे आणि शांतता पूर्ण आंदोलने उभारली होती.

loading image
go to top