धावत्या लोकलमधून  तरुणीला ढकलले वाशी खाडी पुलावरील घटना; लैंगिक अत्याचाराचा संशय 

धावत्या लोकलमधून  तरुणीला ढकलले वाशी खाडी पुलावरील घटना; लैंगिक अत्याचाराचा संशय 

नवी मुंबई : धावत्या लोकलमधून एका 25 वर्षीय तरुणीला ढकलून देत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (ता. 22) उघडकीस आली. ही तरुणी मंगळवारी सकाळी वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळालगत जखमी अवस्थेत सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात सदर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले असून वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

सदर जखमी तरुणी आई-वडील व भावंडांसह टिटवाळा येथे राहते. ती पवई येथे घरकाम करत असून आठवड्यातून एकदा घरी जात असते. त्यानुसार ती गेल्या शनिवारी सायंकाळी टिटवाळ्याला घरी गेली होती. त्यानंतर रविवारी सायंकाळी ती पवई येथे कामावर गेल्यानंतर तिच्या कुटुंबियांचा तिच्याशी संपर्क झाला नव्हता. त्यानंतर मंगळवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास सदर तरुणी वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळालगत जखमी अवस्थेत पडून असल्याचे मोटरमनच्या निदर्शनास आले. मोटरमनने याबाबतची माहिती स्टेशन मास्तरला दिल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे पोलिस आणि आरपीएफच्या जवानांनी तरुणीला वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. 

महापालिका रुग्णालयातील डॉक्‍टरांनी तरुणीवर प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले. सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर असून अद्याप ती बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तिचा जबाब नोंदवल्यानंतरच घटनेविषयी अधिक माहिती मिळेल, असे वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी सांगितले. दरम्यान, प्राथमिक तपासात सदर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे; मात्र फॉरेन्सिक अहवालानंतर सदर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला की नाही याबाबत माहिती मिळेल. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विष्णू केसरकर यांनी सांगितले. 

सीसी टीव्हीतून स्पष्टता नाही! 
या प्रकरणाच्या तपासासाठी वाशी रेल्वे पोलिसांनी हार्बर आणि मध्य रेल्वेवरील सर्व रेल्वे स्थानकांतील सीसी टीव्ही फुटेजची तपासणी केली; मात्र सदर तरुणी कोणत्या स्थानकावरून चढली, हे सीसी टीव्हीत दिसून आले नाही. त्यामुळे वाशी रेल्वे पोलिसांनी सदर तरुणी ज्या ठिकाणी काम करते, तसेच ती ज्या लोकांच्या संपर्कात होती, त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे.

Incident on Vashi creek bridge where a young woman was pushed from a running local train Suspicion of abusement

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com