Mumbai : ‘इंडियन आयडल मराठी’ उद्यापासून सोनी मराठीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इंडियन आयडल मराठी’ उद्यापासून सोनी मराठीवर

‘इंडियन आयडल मराठी’ उद्यापासून सोनी मराठीवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सोनी मराठी वाहिनीवर सोमवार (ता. २२) पासून सुरू होणाऱ्या ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमाच्या ऑडिशनला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवार व मंगळवार रात्री नऊ वाजता सोनी मराठी वाहिनीवर या नव्या संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना आतापर्यंत अनेक उत्तम कार्यक्रम दिले आहेत. ‘इंडियन आयडल मराठी’ त्यातलाच एक. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ असे ब्रीदवाक्य असलेल्या कार्यक्रमाच्या परीक्षकांच्या खुर्चीत असणार आहेत, संगीतविश्वातली एक नावाजलेली आणि लोकप्रिय जोडी अर्थातच महाराष्ट्राचे लाडके गायक व संगीतकार अजय आणि अतुल.

फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि.ची निर्मिती असलेला ‘इंडियन आयडल’ कार्यक्रम पहिल्यांदाच मराठी भाषेत सुरू होणार आहे. अजय-अतुल महाराष्ट्रासाठी सर्वोत्कृष्ट आवाज शोधणार, ही कार्यक्रमाची जमेची बाजू. त्यांच्यासोबत लोकप्रिय गायिका बेला शेंडेसुद्धा असणार आहे. बेस्ट स्पर्धक निवडण्यासाठी ती आपला मोलाचा सल्ला देणार आहे. बेलाने मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य अशा विविध चित्रपटसृष्टींत आपल्या आवाजाची झलक दाखवली आहे. सुरांच्या प्रवासाला लिखाणाचीही साथ लाभणार आहे. लेखक वैभव जोशी कार्यक्रमाचे लिखाणकरीत आहेत. गायक-संगीतकार अजित परब मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. स्पर्धकांनी कोणते गाणे म्हणायचे, ते कसे गायचे आदींबाबतचे मार्गदर्शन ते करणार आहेत.

संगीतकारांच्या मदतीने ते स्पर्धकांना मदत करतील. मराठी आयडल आणि त्यातही अजय-अतुल परीक्षण करणार असल्याने रसिकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. कार्यक्रमाच्या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे एकापेक्षा एक कलाकार कानाकोपऱ्यांतून ऑडिशनला आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम गायक-गायिका महाराष्ट्राला मिळतील, यात शंका नाही.

loading image
go to top