'मुंबई सकाळ'च्या वर्धापनदिनी #IndianOcean बॅण्डने जागवली कर्करोगग्रस्तांमध्ये जगण्याची आशा

'मुंबई सकाळ'च्या वर्धापनदिनी #IndianOcean बॅण्डने जागवली कर्करोगग्रस्तांमध्ये जगण्याची आशा

नवी मुंबई :  गेल्या वर्षी अनोख्या संगीत मैफलीने हजारो रसिकांच्या साक्षीने "आर्ट ऑफ आर्ट'चे सूर छेडत हृदयाची लढाई लढण्यासाठी त्यांना बळ देत सामाजिक भान जपणाऱ्या "सकाळ' वृत्तपत्राचा 49 वर्धापनदिनही रविवारी (ता. 26) प्रजासत्ताकदिनी मोठ्या जल्लोषात साजरा झाला. देशातील नंबर 1 असलेल्या "इंडियन ओशन' रॉकबॅण्डच्या सूरमयी लाटा खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये उसळत होत्या. सुरांच्या महासागरात अवघी नवी मुंबई स्वार झाली आणि "सकाळ'चा कर्करोगाविरोधातील लढा अधिक व्यापक होत अनेकांच्या मनात जगण्याची आशा अर्थातच "होप ऑफ लाईफ' जागवून गेला. दहा हजारांहून अधिक प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या ऍम्फी थिएटरमध्ये "इंडियन ओशन' बॅण्डचे पाच कलाकार विविध वाद्यांच्या माध्यमातून सुरेल आविष्कार करीत होते अन्‌ समाजमन टिपणाऱ्या त्यांच्या गाण्यांची "जादूमाया' रसिकांवर मोहिनी करीत गेली ती मैफल संपेपर्यंत... 

यंदा "सकाळ'ची मुंबई आवृत्ती सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी झालेल्या कार्यक्रमाला मान्यवरांची मोलाची साथ आणि रसिकांचा विक्रमी प्रतिसाद लाभला. समाजाच्या आरोग्यासाठी आणि एकंदर "वेलनेस'साठी बातमीच्या पलीकडे जात "सकाळ' विविध उपक्रम राबवत असते. वाचकांचे वैचारिक, सामाजिक आणि शारीरिक विश्‍व समृद्ध करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो. त्यासाठीच सुरू आहे "होप आफ लाईफ' महामोहीम. कर्करोगाची शिकार झालेल्यांना आधार देण्याच्या "सकाळ'च्या लढाईत अनेक डॉक्‍टर आपली लेखणी घेऊन हिरिरीने सहभागी झाले आहेत. उपक्रमाचाच एक भाग म्हणून रविवारी "इंडियन ओशन'ची संगीत मैफल सादर झाली. मैफलीच्या रूपात खारघरमध्ये जणू काही सूरसागरच उसळला होता. 


लोकसंगीत आणि रॉक यांच्या अनोख्या फ्युजनसाठी ओळखल्या जाणाऱ्या बॅण्डच्या सुरेल गाण्यांची अनुभती घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने रसिक उपस्थित होते. सायंकाळी पाच-साडेपाचपासूनच ऍम्पी थिएटरच्या पायऱ्या भरू लागल्या. महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे जथ्येच्या जथ्ये जमू लागले. कार्यक्रमस्थळी असलेल्या सेल्फी पॉईंटवर थोडेसे फोटोसेशन झाल्यावर आपापल्या जागा पटकावून त्यांचे "कान' बॅण्डचा सूर टिपण्यासाठी आतुर झाले होते. अखेर तो क्षण आला आणि "देस मेरा रंगरेज ये बाबू...'चे बोल कानावर पडताच गर्दीत चैतन्य उसळले. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त बॅण्डने मैफलीची सुरुवातच देशभक्तीपर गीताने केली. अनेक लाईव्ह बॅण्डमध्ये शब्दसुरांची मैफल रंगते; पण "इंडियन ओशन'ने वाद्यांच्या साथीने अफलातून आविष्कार घडवत जनसागरात सुरांच्या लाटा उमटवल्या. त्यांच्या गाण्यात शब्दांची ताकद होतीच; पण वाद्यांतून उमटणारे सूर अधिक "बोलके' होते... थेट काळजाची तार छेडणारी बोटे विविध वाद्यांवर फिरत होती नि इथे रसिकांच्या अंतर्मनात जादूचे प्रयोग होत होते. हे जादूगार होते, राहुल राम (बास गिटारिस्ट), निखिल राव (लीड गिटारिस्ट), अमित किलम (ड्रमवादक), हिमांशु जोशी आणि तुहीन चक्रवर्ती (तबला). गिटार, ड्रम, ढोलकी, तबला, डफली, बासरी आणि एकतारी यांची जुगलबंदी अख्खा कार्यक्रमभर सुरू होती. बॅण्डचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रत्येक गाण्यात वाद्यांची "काळीजचोर' नजाकत होती. वाद्याचा एकेक ताल तन-मन शहारून टाकत होता. संस्कृत श्‍लोक आणि सुफी गीतांपासून भारतीय लोकसंगीताला बदलत्या सामाजिक-राजकीय रंगात घोळवून पाश्‍चिमात्य सुरावटीचा साज चढवण्यात हातखंडा असलेल्या "बॅण्ड'ची झलक संपूर्ण मैफलीत जाणवली. प्रत्येक गाण्यामागची संकल्पना अन्‌ मथितार्थ उलगडत सांगून रसिकांशी संवाद साधत त्यांनी त्यांना सतत सुरांच्या प्रवाहात झुलवत ठेवले. दीड-पावणेदोन तास चाललेल्या कार्यक्रमांत अनेक गाणी सादर झाली. पाचही कलाकारांच्या सादरीकरणाने सुरांची सुनामी आली, वाद्यांची जुगलबंदी रंगली, वन्स मोअरची बरसात झाली आणि महत्त्वाचे म्हणजे, कर्करोगविषयक जागर उपस्थितांच्या मनात आशा नेहमीच जिवंत असते, हे बिंबवून गेला... 

तू किसी रेल से गुजरती है... 
राहुल राम यांनी "मसान'मधील "तू किसी रेल से गुजरती है...' गायला सुरुवात करताच रसिक भारावून गेले. ते सुरांच्या तालावर बेभान होऊन थिरकले. "लव्ह ऍट फर्स्ट साईट'ची प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या गाण्याची जादू लाईव्ह अनुभवायला मिळाल्याने रसिक हरवून गेले होते. त्यानंतर संत कबिरांचे "झिनी रे झिनी रे झिनी चदरियॉं...' बॅण्डने आपल्या स्टाईलने सादर केले. अनेकांनी आतापर्यंत अनेक प्रकारे सादर केलेला कबिरांचा सार्वकालिक दोहा पाश्‍चिमात्य सुरावटीवर ऐकताना रसिक मंत्रमुग्ध झाला. 

"रूक जा रे बंदे...' आजही रिलेव्हंट 
रसिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, ते "रुक जा रे बंदे...' सादर होताच अंगावर शहारे आले. "ब्लॅक फ्रायडे'मधले हे गाणे तेव्हाही रिलेव्हंट होतं, आजही आहे आणि कदाचित पुढेही राहील, असे राम यांनी सांगताच सामाजिक भेद प्रतीत झाला. धार्मिक हिंसेचे भूत आजही उतरले नसल्याची खदखद त्यांच्या गायकीत उतरली होती. जी अस्वस्थ करून गेली. 

"रिबर्थ' कॉन्सर्टला समर्पित 
राम यांनी आपले इन्स्ट्रुमेंटल रिबर्थ गाणे मैफलीला समर्पित केले. त्यातूनही कर्करोगाबाबत जागृतीच होत असल्याचे ते म्हणाले. शब्दांविना असलेले गाणे "वाजवताना' त्यांनी "सकाळ'च्या मोहिमेचे कौतुक केले. नियमित वैद्यकीय तपासण्या जरूर करा, असे आवाहनही सर्वांना केले. 

नर्मदेवरील जलतंरगाने रसिक चिंब 
"इंडियन ओशन' बॅण्डने सादर केलेल्या नर्मदा नदीवरील खळाळत्या लोकगीताने उपस्थित रसिकांच्या मनात जलतरंग निर्माण केले. निर्मळपणे वाहणाऱ्या नर्मदेचे खळाळते रूप गीत आणि संगीतातून ऐकण्याच्या अनुभूतीत रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. अथांग जनसमुदायाचा उत्साह जणू वाद्याच्या आणि सुरेल बोलांच्या तालावर वाहत जाऊन थेट बॅण्डमधील कलाकारांच्या उत्स्फूर्ततेत जाऊन मिसळला. अप्रतिम कलासादरीकरणाला रसिकांचा दिलसे प्रतिसाद मिळाला. लोकसंगीताच्या पार्श्‍वभूमीवर स्टेजवर अफलातून रोषणाईची जणू रंगपंचमीच सुरू होती. बीटस्‌च्या तालानुरूप बदलणारे प्रकाशरंग सुमधुर गाण्यांना अधिकच खुलवत होते. 

"गबगुबी' अन्‌ गिटारचा तोडीस तोड ठेका 
नर्मदा नदीवरील गाणे संपताच व्यासपीठावर शब्दांविना ताल गुंजू लागले. राहुल यांची बोटे गिटारीच्या तारांवर भिरभिरू लागली अन्‌ उमटलेला झंकार रसिकांना मंत्रमुग्ध करीत नाही तोच अमित यांनी ड्रम सोडून "गबगुबी' हाती घेतली. दोन तारांचे अनोखे वाद्य पाहून रसिक आधी संभ्रमात पडले. ते पाहून राहुल यांनी "गबगुबी'ची ओळख रसिकांना करून दिली. "बंगालमध्ये दोन तारांचे असे पारंपरिक वाद्य वाजवले जाते. तुमच्या इथे ते एकतारा म्हणून प्रसिद्ध आहे. फरक एवढाच, की बंगालमध्ये ते छोट्या तबल्याच्या आत तारा लावून वाजवले जाते...' राहुल यांचे बोलणे थांबताच अमित यांच्या हातातून तंतुवाद्याचा सुरेल नजराणा सादर झाला. त्याला तुहीन यांच्या तबल्याची साथ मिळाली नि नंतर स्टेजवर जी सांगीतिक दंगल झाली ती ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले. वाद्यांची एक वेगळीच ताकद यानिमित्त ऐकायला मिळाली. 

"वंदे मातरम्‌...'चे गारूड 
रसिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या "कंदिसा' गाण्याने बॅण्ड मैफलीचा शेवट केला. "कंदिसा' सुरू होताच रसिकांनी थेट रॅम्पच्या मोकळ्या जागेत धाव घेतली नि शब्दसुरात बेधुंद होत मन मोकळे केले. "मॉं रेवा थारो पानी' तो गाण्यातली इन्स्ट्रुमेंटल गोडवा रसिकांच्या थेट काळजापर्यंत पोहोचला.... वाद्याच्या निनादातून जेव्हा "वंदे मातरम्‌...'चे सूर उमटले तेव्हा प्रत्येकाची छाती अभिमानाने भरून आली. असे गारूड मैफलीच्या दरम्यान अनेकदा अनुभवावयास मिळाले. 

"जादूमाया...'ने दिली प्रेरणा 
राहुल आणि त्यांच्या टीमने काही अनरिलीज गाणीही रसिकांसमोर सादर केली. त्यातलेच एक "जादूमाया...' अर्थात गाणे नवे असल्याने त्याचे शब्द कधी ऐकण्यात आले नव्हते. मात्र गाण्याला सुरुवात होताच ऍम्फी थिएटरमध्ये शांतता पसरली. काळजाला हात घालणारे गाण्याचे बोल जगण्याचे रहस्य विशद करत होते. "कुछ खाक समझ ना आवेगी इस दुनिया की जादूमाया' ऐकताना मन विषण्ण होत होते. कर्करोग माणसाला संपवू शकतो का? तर नाही... माणूसच स्वतःला संपवू शकतो. असाध्य आजारात गुरफटल्यावर तो हार मानू लागतो. पण तसे नसते. अशा वेळी "जादूमाया' कामी येते. अर्थात "होप ऑफ लाईफ'! अशीच जगण्याची प्रेरणा निर्माण केली ती "इंडियन ओशन'च्या जिंदादिल सुरावटींनी... 
 Indian ocean performed on the occasion of 49th anniversary of mumbai Sakal for the cause of cancer awareness 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com