Ukraine-Russia: युक्रेनच्या सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना रॉडनं मारहाण

युक्रेनमध्ये अडकलेल्या ठाण्याच्या साक्षी इजंतकरनं सांगितली आपबिती
Ukraine
UkraineSakal

ठाणे : दहा किलोमीटरची पायपीट आणि दोन दिवस थंडी कुडकुडत रस्त्यावर ताटकळत घालवल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना अमानुष छळाला सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलं आहे. पोलंडमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांना पोलीस लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत असल्यानं भेदरलेल्या अवस्थेतच या विद्यार्थ्यांनी पुन्हा लविवि येथील आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा रस्ता धरला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये ठाण्यातील साक्षी इजंतकर हिचाही समावेश असून तिने आपल्या वडिलांना सांगितलेल्या युक्रेनमधील परिस्थितीची ऑडिओ क्लीप सकाळ समूहाकडे उपलब्ध झाली आहे. (Russia-Ukraine Crisis Updates)

रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तिथं शिक्षण घेणाऱ्या आणि व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या हजारो भारतीयांना जीव मुठीत घेऊन रोमानिया आणि पोलंडमार्गे पलायन करण्याची वेळ ओढावली आहे. त्यातच ठाण्यातील साक्षी इजंतकर हिच्या एका ऑडिओ क्लीपमुळं खळबळ उडाली आहे. साक्षी लविव येथील वैद्यकीय महाविद्यालयात चौथ्या वर्षात शिकत आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय दुतावासाने जारी केलेल्या सुचनेनुसार तिच्या महाविद्यालयातील २६ जणांच्या टीमसोबत ती शेहयनी मेडिका सीमेवर दहा किमीची पायपीट करत पोहचली. पण तिथं गेल्यावर भारतीय दुतावासातील एकही अधिकारी हजर नसल्यानं या विद्यार्थ्यांना गोठवणाऱ्या थंडीतच रस्त्यावर दोन रात्र थांबावं लागलं. ही फरफट सुरू असताना आता या विद्याऱ्यांना युक्रेन पोलिसांनी रॉडनं मारहाण केल्याची माहिती साक्षीनं वडील अश्विनकुमार इजंतकर यांना मोबाईलद्वारे दिली.

काय म्हणाली साक्षी

"आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा युक्रेनच्या सुरक्षा रक्षकांनी आम्हाला घेरलं. पोलंडच्या प्रवेशद्वारावर आम्हाला प्रवेश मिळत नव्हता. केवळ युक्रेनियन्सना आत घेतलं जात होतं. खूप विनवण्या केल्यानंतर त्यांनी केवळ भारतीय महिलांनाच प्रवेश दिला. त्यानंतर पोलिसांनी भारतीय विद्यार्थ्यांना खूप मारलं त्यांचा छळ केला. ज्यांना दम्याचा त्रास होत होता त्यांना कोंडलं. त्यानंतर रात्री मुलांना मारझोड करून प्रवेश देण्यात आला. आम्ही सर्वजण अतिशय घाबरलो होतो. येथील सुरक्षारक्षकांनी चार रांगा, तीन रांग असं म्हणत पुन्हा बंदूकीच्या दांड्यानं आम्हाला मारलं. आम्ही आतमध्ये गेलो तर हंटर खेळ खेळण्यास सांगितलं गेलं. यावेळी ते रॉड, बंदूका घेऊन उभे होते. हा खेळ खेळल्यानंतरच तुम्हाला व्हिजा मिळेल असंही या सुरक्षा रक्षकांनी आम्हाला सांगितलं", अशा शब्दांत साक्षीनं आपल्यावर ओढवलेला भयानक प्रसंग आपल्या वडिलांसमोर कथन केला.

पुन्हा गाठलं महाविद्यालय

भारतीय दुतावासांचीही पोलिश पोलिसांकडून अडवणूक होत असल्यानं त्यांनीही या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मदत करण्यास असमर्थता दर्शवली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं हतबल होऊन साक्षीसह तिच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुन्हा लविव गाठलं असल्याची माहिती साक्षीचे वडील अश्विनकुमार इजंतकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com