गड्या फिरायला आपला देशच बरा!

उत्कर्षा पाटील :  सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

टूर कंपन्यांच्या बुकिंगचा आढावा घेतला असता देशांतर्गत पर्यटनाला यंदाच्या वर्षी भारतीयांनी पसंती दिली आहे. त्याला आर्थिक मंदी कारण नसून कोरोना विषाणूच्या भीतीने यंदा परदेशातील पर्यटन थंडावले आहे. भारतातही हिमालच प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांना पसंती दिली जात आहे. 

मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीत युरोपबरोबरच अमेरिका, बॅंकॉक, दुबई, थायलंड किंवा हॉंगकॉंगमध्ये सैर करण्याकडे भारतीय पर्यटकांचा ओढा असतो. मात्र, यंदा भारतीय पर्यटकांना परदेशात फिरण्यात फारसे स्वारस्य नाही. टूर कंपन्यांच्या बुकिंगचा आढावा घेतला असता देशांतर्गत पर्यटनाला यंदाच्या वर्षी भारतीयांनी पसंती दिली आहे. त्याला आर्थिक मंदी कारण नसून कोरोना विषाणूच्या भीतीने यंदा परदेशातील पर्यटन थंडावले आहे. भारतातही हिमालच प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांना पसंती दिली जात आहे. 

हेही वाचा - ससून डॉकचा मत्स्यव्यवसाय संकटात 

आशिया खंडातील देशांमध्ये जाण्यास पर्यटक तयारच नाहीत. तब्बल ३५ टक्के पर्यटन कमी झाले आहे. परदेशवारीसाठी यंदा फक्त नेपाळलाच पसंती मिळाली आहे. काश्‍मीर, नैनिताल, ईशान्य भारत, हिमाचल, नेपाळ आदी ठिकाणच्या पर्यटनाचे बुकिंग हाउसफुल झाले आहे. परदेशात रशियासारख्या नव्या टूर डेस्टिनेशनला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना विषाणूंमुळे सिंगापूर, मलेशिया आदी ठिकाणच्या सहलींकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. आमच्या टूर दक्षिण पूर्व देशांमध्ये जात आहेत. मात्र, त्याला पर्यटकांचा प्रतिसाद कमी आहे, असे "केसरी टूर्स''चे संचालक शैलेश पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, की मोठ्या सहलींपेक्षा सात ते आठ दिवस किंवा पाच ते सहा दिवसांसारख्या छोट्या पर्यटनाकडे पर्यटकांचा कल आहे. पैशांचा विचार करून पर्यटक मोठ्या सहलींना जातात. 10 ते 13 दिवसांच्या सहलींमध्ये खर्च जास्त होतो. अमेरिका आणि युरोप टूर्स 10 ते 12 दिवसांच्या असतात. तिथे पर्यटक जातात, पण यंदा त्याचे प्रमाण कमी झाले आहे.

हेहीवाचा - तो पर्यंत शांत बसणार नाही; देवेंद्र फडणवीस गरजले!

या वर्षी हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फ पडला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आईस सफारी करण्याकडे पर्यटकांचा कल आहे. त्याप्रमाणे काही सहलींचे नियोजन पर्यटक कंपन्यांनी केले आहे. म्हणून हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळांच्या बुकिंगला पर्यटकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. पर्यटन व्यवसायात मंदीचा परिणाम कमी झाला आहे. पर्यटनाचे प्रमाण वाढू लागले आहे, असे कौस्तुभ टूर्सच्या संचालिका सुनिता वनारसे यांनी सांगितले. 

काश्मीर, हिमाचल प्रदेश, लेह, लडाख आदी ठिकाणी पर्यटकांचे उन्हाळी सुट्टीच्या पर्यटनासाठी बुकिंग होत आहे. या वर्षी आम्ही भूतान, थायलंड आणि दुबई सहली सुरू केल्या; परंतु कोरोना विषाणूच्या भीतीमुळे पर्यटक परदेशी सहलीवर जाण्याची जोखीम घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे परदेशी सहलींच्या बुकिंगना अल्प प्रतिसाद मिळत आहे.
- सुनीता वनारसे, 
संचालिका, कौस्तुभ टूर्स

सहलींवर परिणाम

  •     कोरोना विषाणूच्या भीतीमुळे दक्षिण पूर्व आशियातील सहलींवर ३५ टक्के परिणाम 
  •     देशांतर्गत पर्यटनामध्ये हिमाचल प्रदेश, लेह, सिमला आणि कुलू-मनाली हाउसफुल
  •     मोठ्यापेक्षा छोट्या आठवडाभरच्या सहलींवर जाण्याकडे पर्यटकांचा कल वाढला.

 Indians prefer domestic tourism this year 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indians prefer domestic tourism this year