इंडोनेशियन तरुणीने पुणेकर मित्राला गंडवले; खोट्या लोकेशनद्वारे मित्राची फसवणूक

अमित गवळे
Tuesday, 20 October 2020

पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली असता ती तरुणी इंडोनेशियातच असून तिने खोट्या लोकेशनद्वारे आपल्या मित्राला फसवल्याचे उघड झाले. 

पाली ः आपल्या पुण्यातील मित्राला भेटण्यासाठी इंडोनेशियावरून एक तरुणी रविवारी (ता. 18) आली होती. मात्र उबेर चालकाने तिला पुण्याऐवजी सुधागड तालुक्‍यातील पडघम येथे सोडले. त्यामुळे गोंधळलेल्या तरुणीने आपल्या पुण्यातील मित्राला ती जेथे आहे तेथील लोकेशनच पाठवले. मित्राने तत्काळ याविषयी पाली पोलिसांना कळवले; मात्र पाली पोलिस पडघम गावात पोहचले असता ती तरुणी बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केली असता ती तरुणी इंडोनेशियातच असून तिने खोट्या लोकेशनद्वारे आपल्या मित्राला फसवल्याचे उघड झाले. 
क्रिस्ती अजलेना दशेरा (वय 27, रा. इंडोनेशिया) असे मित्राची फसवणूक करणाऱ्या तरुणीचे नाव आहे; तर क्रिस्ती हरवल्याची तक्रार देणाऱ्या तरुणाचे नाव सूरजप्रकाश विनोदकुमार दिवेली (वय 28, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे) असे आहे. 

अवैध रेती उपसा करणाऱ्यांना शहापुर तहसीलदारांचा दणका! पाच बोटी केल्या नष्ट

इंडोनेशियावरून आलेली क्रिस्ती सुधागड तालुक्‍यातील पडघवली येथून रविवारी रात्री आठच्या सुमारास बेपत्ता झाल्याची तक्रार सूरजप्रकाश याने पाली पोलिस ठाण्यात दिली. सूरजने दिलेल्या फिर्यादीनुसार, क्रिस्ती उबेर टॅक्‍सीने पुण्याकडे निघाली होती; मात्र उबेर टॅक्‍सीचालकाने आपण मगरपट्टा, पुणे येथे पोहचलो आहोत. असे सांगून क्रिस्ती हिला सुधागड तालुक्‍यातील पडघवली येथे सोडून दिले. मात्र त्यानंतर क्रिस्ती कोणालाही दिसली नाही. 

- पोलिसांचा वेगाने तपास 
पाली पोलिसांनी क्रिस्तीचा शोध घेतला; मात्र ती सुधागडमध्ये सापडली नाही. त्यामुळे पोलिसांनी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साह्याने तिचे लोकेशन तपासले असता ते इंडोनेशियात दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी क्रिस्तीच्या ऑफिसमध्ये फोन लावला; मात्र तिने आपण रुग्णालयात असल्याचे कळवत अधिक बोलण्यास नकार दिला. त्या वेळी पोलिसांनी ख्रिस्तीच्या ही इंडोनेशियातील ऑफिसमध्ये फोन केला. तेव्हा ऑफिसमधून ती इंडोनिशियामध्येच असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. दरम्यान मुंबई एअरपोर्टला पोलिसांनी चौकशी केली असता क्रिस्ती नावाची कोणतीही तरुणी येथे आली नसल्याचे त्यांनी सांगितले. 

 

इंडोनेशियातील तरुणीने खोट्या लोकेशनद्वारे आपल्या मित्राला फसवले. त्यानेदेखील तिच्यावर विश्‍वास ठेवून ती बेपत्ता असल्याची तक्रार पाली पोलिसांमध्ये दिली; मात्र आम्ही तपास केला असता ती इंडोनेशियावरून भारतात आलीच नसल्याचे उघड झाले. 
- बाळा कुंभार,
पोलिस निरीक्षक, पाली पोलिस ठाणे, सुधागड 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indonesian girl ravages Punekar friend Cheating on a friend with a false location