कल्याणमध्ये जीन्स कारखान्यांचे पेव

रवींद्र घोडविंदे
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

उल्हासनगरमधील प्रदूषणास कारणीभूत ठरलेले जीन्स कारखाने बंद करण्यास पालिका प्रशासनाने हालचाली सुरू करताच या कारखानदारांनी नजीकच्या कल्याण तालुक्‍यातील ग्रामीण भागात स्थलांतर केले. येथील जागामालकांना भरघोस रकमेचे भाडे देण्याचे प्रलोभन दाखवत या जिन्स कापड बनविणाऱ्या कारखानामालकांनी ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रदूषण मंडळ, ग्रामपंचायतीच्या परवानगीविना कल्याणच्या ग्रामीण भागात २५ हून अधिक जीन्स कारखाने सुरू आहेत.

टिटवाळा : उल्हासनगरमधील प्रदूषणास कारणीभूत ठरलेले जीन्स कारखाने बंद करण्यास पालिका प्रशासनाने हालचाली सुरू करताच या कारखानदारांनी नजीकच्या कल्याण तालुक्‍यातील ग्रामीण भागात स्थलांतर केले. येथील जागामालकांना भरघोस रकमेचे भाडे देण्याचे प्रलोभन दाखवत या जिन्स कापड बनविणाऱ्या कारखानामालकांनी ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रदूषण मंडळ, ग्रामपंचायतीच्या परवानगीविना कल्याणच्या ग्रामीण भागात २५ हून अधिक जीन्स कारखाने सुरू आहेत. रासायनिक पाण्यामुळे येथील शेतजमीन धोक्‍यात आली असून, या कारखान्यांना प्रतिबंध घालण्याची मागणी केली जात आहे. 

कल्याणच्या ग्रामीण भागातील कांबा, वरप, रायते, गोवेली, वाहोळी, आपटी, माजर्ली, पोई, चवरे, भिसोळ, बापसई, फळेगाव, म्हसकल या ग्रामपंचायत हद्दीत हे कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांतून निघणारे केमिकलमिश्रित रंगीबेरंगी पाणी, त्याला येणारा उग्र वास यामुळे ग्रामीण भागात जल व वायू प्रदूषणाची समस्या वाढली आहे; तर रासायनिक पाण्यामुळे सुपीक जमिनीचा पोत नापीक होत आहे. हे सर्व कारखाने माळरान शेतजमिनीत सुरू करण्यात आल्यामुळे तालुक्‍यातील भाताची व भाजीपाल्याची शेती धोक्‍यात आली आहे. 

जिन्स कारखान्यांना प्रदूषण मंडळ व सांडपाणी निचऱ्याबाबत ग्रामपंचायतीची परवानगी आवश्‍यक आहे. या परवानग्या कारखानाचालकांनी घेतल्या नसल्याचे समोर आले आहे. कारखान्यांना महावितरणने बिनाबोभाट थ्री फेज वीजजोडण्या दिल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरही बसविले नाहीत. एका जिन्स कारखान्याला ३०० किलो वॉटपेक्षा अधिक वीज लागते. ग्रामीण भागात २५ हून अधिक कारखाने सुरू आहेत. त्यामुळे वीज व्यवस्था कोलमडली असून, ग्रामीण भागाबरोबरच टिटवाळा व कल्याण तालुक्‍यातील वीज वितरण व्यवस्थेला याचा फटका बसत आहे.

---------------
कल्याण तालुक्‍यात जागोजागी वालधुनी नदीच्या पाण्याप्रमाणे पाणी साचलेले दिसते. त्यामुळे जमीन नापीक होऊन येथील शेती संपेल.
- जयेश शेलार, कार्याध्यक्ष,
शेतकरी संघ कल्याण तालुका,

ग्रामीण भागातील बेकायदा जीन्स कारखान्यांवर तत्काळ कारवाई करणार.
- दीपक आकडे, तसीलदार, कल्याण तालुका

कारखान्यांना प्रदूषण मंडळाची परवानगी नाही. जीन्स कारखान्यांवर बंदी आहे; तरी कारखाने सुरू असतील, तर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील.
- विठ्ठल वाघमारे, 
प्रदूषण मंडळ अधिकारी, कल्याण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Influx of Jeans factories in Kalyan