
INS Vikrant Case : सोमय्या पिता-पुत्रांना क्लीन चिट
मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा नगरसेवक मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडला नाही, अशी कबुली मुंबई पोलिसांनी आज उच्च न्यायालयात दिली. यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना दिलासा मिळाला आहे. सोमय्या यांच्याविरोधात माजी सैनिक बबन भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
विक्रांत युद्धनौकेचे जतन करण्यासाठी सोमय्या यांनी नागरिकांना आवाहन करून सुमारे ५७ कोटींचा अपहार केला, असा आरोप याचिकेत केला आहे. बुधवारी न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या यांनी आर्थिक निधी जमा केला; पण तो अधिकृतपणे राज्यपालांकडे जमा केला नाही, असा आरोप भोसले यांनी केला होता; मात्र सोमय्या यांनी आरोपांचे खंडन केले होते. या प्रकरणात सखोल चौकशी केली. मात्र सोमय्या यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडला नाही, असे मुंबई पोलिसांनी आज न्यायालयात सांगितले.
‘आधी नोटीस द्या’
सोमय्या पिता-पुत्रांविरोधात विक्रांत गैरव्यवहार प्रकरणात कोणतेही पुरावे नाहीत. पोलिसांनी याबाबतची कबुली दिल्याची न्यायालयाने नोंद घेतली आणि याचिकाही निकाली काढली. तसेच त्यांच्या अटकेची आवश्यकता भासल्यास त्यांना ७२ तास आधी नोटीस द्यावी, असे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले.