महापालिकेच्या प्रयोगशाळेत खासगी विकासकांच्या बांधकाम मटेरिअलचीही तपासणी शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai municipal corporation

मुंबई महानगरपालिकेकडून यापुढच्या काळात खासगी विकासकांचे बांधकामाच्या मटेरिअलचे नमुने तसेच बांधकाम साहित्याची तपासणी करणे शक्य होणार आहे.

Mumbai News : महापालिकेच्या प्रयोगशाळेत खासगी विकासकांच्या बांधकाम मटेरिअलचीही तपासणी शक्य

मुंबई - मुंबई महानगरपालिकेकडून यापुढच्या काळात खासगी विकासकांचे बांधकामाच्या मटेरिअलचे नमुने तसेच बांधकाम साहित्याची तपासणी करणे शक्य होणार आहे. पालिकेच्या प्रयोग शाळेस एनएबीएलमार्फत नुकतेच राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. त्यामुळे पालिकेला यापुढच्या काळात विभागाअंतर्गत तसेच खासगी संस्था आणि व्यवसायांचेही नमुने तपासणे शक्य होणार आहे. पालिकेने या प्रयोग शाळेत क्षमतावाढ करतानाच अत्याधुनिक अशी साधनसामुग्रीही बसवलेली आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रयोगशाळेत चाचण्यांची संख्याही वाढणार आहे. या प्रयोगशाळेच्या विस्तारामुळे पालिकेला महसूलही प्राप्त होणार आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनाही ही चाचणीची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती दक्षता विभागाचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

मुंबईभर पालिकेच्या विविध विभागांकडून विकासाची अनेक नवीन कामे तसेच दुरुस्‍ती आणि देखभालीची कामे करण्‍यात येतात. या कामांमध्‍ये वापरण्‍यात येणा-या साहित्‍य सामुग्रीची तपासणी करण्‍यासाठी प्रमुख अभियंता (दक्षता) विभागाच्‍या देखरेखीखाली बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची प्रयोगशाळा वरळी येथे सन १९५८ पासून कार्यरत आहे. महानगरपालिकेच्‍या रस्‍ते, पूल, इमारत बांधकाम, इमारत देखभाल तसेच दुरुस्‍ती, मुंबई मलःनिसारण प्रकल्‍प, मलःनिसारण प्रचालन, मलःनिसारण प्रकल्‍प, जल अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्‍प, पर्जन्‍य जलवाहिन्‍या, रुग्‍नालये, उद्याने इत्‍यादी खात्‍यामार्फत तसेच २४ विभाग पातळीवर अनेक प्रकारची तांत्रिक कामे करण्‍यात येत असतात.

या कामांमध्‍ये वापरण्‍यात येणा-या साहित्‍य सामुग्रीचा दर्जा निर्धारित मानकांप्रमाणे तपासण्‍यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्‍या दक्षता विभागाच्‍या अधिपत्‍याखाली स्‍वतंत्र अशी प्रयोगशाळा वरळी येथे कार्यरत आहे. सदर प्रयोग शाळेमध्‍ये सिमेंट, सळई तसेच लोखंड, खडी, विटा, रेती, लाकूड, लादी, डांबर, असफाल्‍ट, काँक्रिट इत्‍यादी बांधकाम साहित्‍याच्‍या नमुन्‍यांची चाचणी करुन दर्जा तपासण्‍यात येतो. यासाठी प्रयोगशाळेमध्‍ये अनेक प्रकारच्‍या यंत्रसामुग्री आणि मशीन्‍स, तंत्रज्ञान उपलब्‍ध असून त्‍यासाठी अभियंते व तंत्रज्ञ कार्यरत आहेत.

महानगरपालिकेच्‍या साहित्‍य चाचणी प्रयोगशाळेची केंद्र शासनाच्‍या “राष्‍ट्रीय परीक्षण अंश-शोधन प्रयोगशाळा आणि मान्‍यता मंडळ (NABL)”या संस्‍थेकडून पाहणी करण्‍यात आली. सदर पाहणी दरम्‍यान (NABL)च्‍या सक्षम सल्‍लागार, तंत्रज्ञांच्‍यामार्फत प्रयोगशाळेत उपलब्‍ध असलेल्‍या सोई-सुविधांची, तंत्रज्ञानाचे तसेच तंत्रज्ञांचे परिक्षण करुन गुणवत्‍ता तपासण्‍यात आली. सदर तपासणी नंतर (NABL) कडून प्रयोगशाळेची प्रशंसा करुन राष्‍ट्रीय मानांकनाचा दर्जा पारित करण्‍यात आला असून तसे प्रमाणपत्र देण्‍यात आले आहे. त्‍यामुळे महानगरपालिकेची साहित्‍य चाचणी प्रयोगशाळा आता ‘राष्‍ट्रीय परीक्षण आणि अंश-शोधन प्रयोगशाळा’ (NABL) यांच्याद्वारे मान्यताप्राप्त प्रयोगशाळा गणली गेली आहे.

महानगरपालिकेची साहित्‍य चाचणी प्रयोगशाळा राष्‍ट्रीय परीक्षण अंश-शोधन प्रयोगशाळा आणि मान्‍यता मंडळ (NABL) मान्यता प्राप्‍त झाल्‍याची बाब अभिमानास्‍पद असून तेथे अनेक नवीन चाचण्‍या करण्‍यासाठी सोयी-सुविधा उपलब्‍ध आहेत. अलिकडेच, काँक्रिट दर्जा तपासणी क्षमता वाढविण्‍यासाठी दोन अत्‍याधुनिक संनियंत्रित व स्‍वयंचलित मशिनची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. सदर मशीन्‍स संनियंत्रित व स्‍वयंचलित असल्‍याने, चाचण्या करण्‍याचा वेग वाढला आहे. त्‍यामुळे अचूक चाचणी अहवाल कमीतकमी वेळेत उपलब्‍ध होत असून चाचणीचा दर्जा व विश्वासार्हता वाढली आहे. अशाप्रकारे नजीकच्‍या भविष्यकाळात चाचणी कामासाठी अनेक अत्‍याधुनिक यंत्र सामुग्री, उपकरणे व तंत्रज्ञान उपलब्‍ध करण्‍यात येणार असून बांधकाम साहित्‍यासाठी नवीन १५० चाचण्‍या वाढविण्‍यात येणार आहेत.

महानगरपालिकेच्‍या साहित्‍य चाचणी प्रयोगशाळेस राष्‍ट्रीय परीक्षण अंश-शोधन प्रयोगशाळा आणि मान्‍यता मंडळ (NABL) प्रमाणपत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर व प्रयोगशाळेमध्‍ये अनेक नवीन स्‍वयंचलीत व संनियंत्रित यंत्र सामुग्रीची व उपकरणांची व्‍यवस्‍था वाढविल्‍यामुळे चाचणी कामांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.सदर प्रयोगशाळेमध्‍ये महानगरपालिकेच्‍या विविध खात्‍यांकडून व विभागाकडून करण्‍यात येणा-या कामातील साहित्‍याची चाचणी करण्‍याप्रमाणेच इतर शासकीय, निम-शासकीय (म्‍हाडा, सिडको, पीडब्‍ल्‍युडी इत्‍यादी) तसेच खासगी विकासक इत्‍यादी संस्‍थेकडून करण्‍यात येणा-या कामांमधील साहित्‍य चाचणी करण्‍याचा महानगरपालिकेच्‍या प्रशासनाचा मानस आहे.