पोलिस नव्हे, तरुणच देत आहेत खडा पहारा!

दीपक शेलार
गुरुवार, 16 एप्रिल 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच, सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन व्हावे, याकरिता पोलिस दल जीवाचा आटापिटा करीत आहेत. तरीही, सर्वच ठिकाणी पोलिसांना लक्ष पुरवणे शक्य होत नाही. हीच बाब हेरून लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी ठाण्यातील लक्ष्मी-चिराग नगरमधील तरुण पुढे सरसावले आहेत. पोलिसांच्या धर्तीवर येथील रहिवाशांनी चक्क नाकाबंदी सुरू केली आहे. चिरागनगरच्या मुख्य प्रवेशद्वार क्रमांक 2 वर चेक पोस्ट उभारून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला नगरात प्रवेश दिला जात नाही. तसेच, स्थानिक नागरिकांनाही विनाकारण घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच, सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन व्हावे, याकरिता पोलिस दल जीवाचा आटापिटा करीत आहेत. तरीही, सर्वच ठिकाणी पोलिसांना लक्ष पुरवणे शक्य होत नाही. हीच बाब हेरून लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी ठाण्यातील लक्ष्मी-चिराग नगरमधील तरुण पुढे सरसावले आहेत.

काय झाले नेमकं? जितेंद्र आव्हाड म्हणतात, 'मला माफ करा...मी हरलो'!

पोलिसांच्या धर्तीवर येथील रहिवाशांनी चक्क नाकाबंदी सुरू केली आहे. चिरागनगरच्या मुख्य प्रवेशद्वार क्रमांक 2 वर चेक पोस्ट उभारून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला नगरात प्रवेश दिला जात नाही. तसेच, स्थानिक नागरिकांनाही विनाकारण घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे पश्चिमेकडील रेमंड कंपनीनजीकच्या लक्ष्मी-चिराग नगरमधील नागरिकांनी वसाहतीत प्रवेश करणाऱ्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळ 2 ठिकाणी चेक पॉईंट तयार केले आहेत.

येथून येणाऱ्या व जाणाऱ्यांची कसून तपासणी केली जाते. जर त्यांच्या बोलण्यात तथ्य दिसले तर त्यांना पुढे सोडले जाते. अन्यथा, त्यांना घरी परत पाठवले जाते. यासाठी साधारण 100 तरुणांची चार शिफ्टमध्ये विभागणी करण्यात आली असून ही तुकडी दिवस-रात्र खडा पहारा देत आहे.

जर एखादी व्यक्ती बाहेरील कुणाच्याही संपर्कात आलीच नाही तर, त्यांना कोरोना होण्याची शक्यताच नाही. त्यामुळे कोणीही नगराच्या बाहेर जाऊ नये व बाहेरचा कुणी आत येऊ नये, यासाठी येथे अशा प्रकारे विशेष नाकाबंदीची व्यवस्था केली असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

क्लिक करा : धक्कादायक! राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा अडिचशे पार गेल्याने आता झोपडपट्टी भागातील रहिवाशांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. सर्वच ठिकाणी पोलिस अथवा पालिका प्रशासन लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे स्वयंप्रेरणेतून नाकाबंदी सुरू केली असून, अत्यावश्यक कामासाठी नगराबाहेर जाऊन येणाऱ्यांवर सॅनिटायझरची फवारणी करून प्रवेश दिला जात आहे.
- नरेश शिंदे,
स्थानिक रहिवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instead of Police the youth are giving the stand guard!