esakal | Women's Day Special:आयुष्याला जिगरबाज बनविणाऱ्या 'द बायकरनी'
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Day Special:आयुष्याला जिगरबाज बनविणाऱ्या 'द बायकरनी'

आयुष्याला एक धाडसी पण जिगरबाज अंदाज शिकवणाऱ्या द बायकरनी. जानेवारी 2011 मध्ये पुण्यातील धाडसी महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला हा बाइकिंगचा फेसबुकवरील ऑनलाईन प्लॅटफॉर्म.

Women's Day Special:आयुष्याला जिगरबाज बनविणाऱ्या 'द बायकरनी'

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबईः  लहानपणापासून असलेलं बाईकचं आकर्षण, दूरवर पसरलेल्या रस्त्यावर स्वार होत वाऱ्याशी मैत्री करणं,  स्वतःमधल्या वादळाला बाईकवर मनसोक्तपणे भटकंती करुन आणणं आणि आयुष्याला एक धाडसी पण जिगरबाज अंदाज शिकवणाऱ्या द बायकरनी. जानेवारी 2011 मध्ये पुण्यातील धाडसी महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला हा बाइकिंगचा फेसबुकवरील ऑनलाईन प्लॅटफॉर्म. लहानपणापासून असलेलं बाईकचं आकर्षण, बुलेट किंवा बाईक चालविण्याची जबरदस्त इच्छा असलेल्या आणि दूरवर राईडचा पल्ला गाठायला तयार असलेल्या महिलांसाठी द बायकरनीचा मोड महत्त्वाचा ठरणारा आहे. 

द बायकरनीच्या स्थापनेपासून त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासात असलेल्या मुग्धा चौधरी या मूळच्या जळगावच्या. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुग्धा पुण्यात नोकरीनिमित्त असतात. माझी बाईकिंगची आवड शाळेपासूनची. घरामध्ये बाबांची राजदूत बाईक होती. ती आठवीत असतानाच मी चालवायला लागली. कधी कधी मित्रांच्या वडिलांच्या गाडीही चालवायची. पण घरी बाबांना माहीत नव्हतं. दहावी झाल्यानंतर त्यांना हे कळलं. पण त्यांनी अडवलं नाही. उलट चावी देऊन गाडी चालवायला प्रोत्साहन दिलं, असं मुग्धा यांनी सांगितलं.

पुढे पुण्यात शिक्षणासाठी गेली तेव्हा स्कुटी घेतली. 2008 मध्ये मी पहिली सेकंड हॅण्ड पल्सर गाडी घेतली होती. पुण्यातही रायडिंगचा ध्यास कायम राहिला आणि वाढला. तसतशा गाड्याही घेतल्या. तेव्हा मित्रांसोबत राईडला जायचे. त्यातूनच उर्वशी पाटोळे-साने आणि इतर जणींबरोबर ओळख झाली आणि द बायकरनीचा ऑनलाईन ग्रुप सुरू करायचं ठरलं. उर्वशी पाटोळे-साने या ग्रुपच्या संस्थापक आहेत तर मी कोअर फाऊंडर मेंबर आहे. आमच्याबरोबर आणखी काहीजण आहेत. जेव्हा 2011 ला आम्ही सुरु केलं तेव्हा आमच्या  रायडिंगची नोंद लिम्का बुक औफ रेकॉर्डमध्ये झाली. आम्ही दहाजणी होतो. लडाखच्या पुढे खार्दुमला पास आहे तिथं ही राईड होती. देशातील हा पहिला ग्रुप असून भारतभर द बायकरनीचे सुमारे पाच हजारहून अधिक महिला सदस्य आहेत, असे त्या म्हणाल्या.

बाईक राईडिंग हा पुरुषांचा प्रांत समजला जातो. पण आता तसं काही नाही. महिलाही मोठ्या प्रमाणावर बाईक आणि बुलेट चालवतात. त्यांनादेखील स्वतंत्र किंवा ग्रुप रायडिंगची संधी मिळावी, त्यांची आवड पूर्ण व्हावी आणि एक समांतर व्यासपीठ या निमित्ताने महिला बाईकरना मिळावे हाच यामागील मुख्य हेतू आहे. पुरूषांना किंवा कोणाला दाखविण्याच्या उद्देशाने ग्रुप सुरू केला नाही. तर महिलांमधील आवड जोपासण्यासाठी द बायकरनी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये ट्रान्सजेंडर सदस्यही आहेत.  20 पासून 55 पर्यंत वयोगटातील परवानाधारक महिला राईडर यात आहेत. तसेच सदस्यांसाठी गाडी दुरूस्तीचं कार्यशाळाही घेतली जाते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अनेकदा मुली केवळ बुलेट-बाईकच्या आकर्षणामुळे त्याकडे येतात. असे होता कामा नये. दिखावा करण्यासाठी बाईक रायडिंग नका करु, त्यापेक्षा मनापासून इच्छा आणि आवड असेल तर त्यातील तंत्र शिकून घ्या, सुरक्षित आणि जबाबदारीने गाडी चालवायला शिका, गाडी चालवण्यासाठी परवाना घ्या,  आणि  चालवायला सुलभ ठरेल ती गाडी घ्या म्हणजे तुम्ही राईडचा आनंद घेऊ शकाल, असा अनुभवाचा सल्ला त्यांनी दिला.

आतापर्यंत मुग्धा यांनी लाखो मैलांचा प्रवास करून भारतभर अनेक सोलो आणि ग्रुप राईड केल्या आहेत. गुजरातमध्ये सोलो राईड करताना रात्रभर त्यांना रस्त्यावर राहावे लागले होते आणि तेव्हा एका पोलिसाने केलेली मदत  आणि त्याच्या पत्नीने फोनवरून घरी येण्यासाठी दिलेले आमंत्रण लक्षात राहिले आहे, असे त्या आवर्जून सांगतात. द्रावणगिरीच्या एका सोलो राईडला सन 2010 मध्ये रात्री एका लॉजने एकटी महिला म्हणून प्रवेश दिला नव्हता असाही अनुभव त्यांना आला आहे. 

राईड करण्याआधी बाईक दुरुस्तीची माहिती असायला हवी, सोबत असलेल्या किटमध्ये त्यानुसार सामान हवं, आग लावण्यासाठी लायटर, इतर साहित्य हवं, असा त्यांनी दिला. सूर्यास्त झाला की गाडी थांबवावी असा एक नियम त्यांनी स्वतःला आखून दिला आहे. सुरक्षा आणि शरिराला ऊर्जा मिळण्यासाठी याची आवश्यकता असते, असे त्या म्हणतात. 

हेही वाचा-  कोरोना व्हायरसचा पुन्हा धोका? मुंबईत नव्या रुग्णांचा भडका

 जगण्याला वेग नसतो पण वेगाचे आणि प्रवासाचे स्वप्न प्रत्येकालाच पडते. द बायकरनीमुळे अनेक जणींचे हे स्वप्न गुलजार यांच्या या ओळींप्रमाणे साकार होऊ शकते..
उड़ते पैरों के तले जब, बहती हैं ज़मीं
मुड़ के हमने कोई मंज़िल, देखी ही नहीं
रात-दिन राहों पे हम शाम-ओ-सहर करते हैं.
खुश रहो अहल-ए-वतन, हम तो सफर करते हैं...

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

International Womens Day Special 2021 Pune the Bikerni

loading image