सर्वांचीच चौकशी करा, सत्य जनतेसमोर आणा; प्रवीण दरेकर यांचे आव्हान

कृष्ण जोशी
Wednesday, 2 December 2020

एकनाथ खडसे यांना सध्या काही काम नाही आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपावर आरोप करत आहोत असे चित्र त्यांना निर्माण करायचे आहे.

मुंबई ः एकनाथ खडसे यांना सध्या काही काम नाही आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपावर आरोप करत आहोत असे चित्र त्यांना निर्माण करायचे आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच घोटाळेबाज जिल्हा बँक, अर्बन बँक किंवा पतपेढ्या यांच्या चौकशा करा व सत्य जनतेसमोर आणा असे आव्हान विधानपरिषदेतील विरोधीपक्षेनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. 

खडसे यांनी नुकत्याच भाजप नेत्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना दरेकर बोलत होते. खडसे हे आता भाजप नेत्यांवर आरोप करीत आहेत हे स्वाभाविकच आहे. पण चौकशीचा निष्कर्ष जनतेसमोर येईलच व त्यात कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा - वीज मंडळाच्या कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाची धडक! रखडलेली नोकरभरती पूर्ण करण्याची मागणी

कोट्यवधी रुपयांच्या जमिनी मातीमोल भावाने विकल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. मात्र राज्य सहकारी बँकेने जे कारखाने 10 कोटींना लिलावात विकले त्यांची खरी किंमत सुमारे 500  कोटी रुपये होती, त्यामुळे या प्रकाराचीही चौकशी झाली पाहिजे. बुडविण्यात आलेल्या बुलढाणा अर्बन बँक, वर्धा बँक, नागपूर बँक यांचीही चौकशी करावी. फक्त जागाच आहे पण प्रकल्पच उभारला नाही, अशांसाठीही राज्य बँकेने कर्जे दिली आहेत, त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही दरकेर यांनी केली.

हेही वाचा - जनसुविधा व आर्थिक शिस्तीसाठी महापालिकांची बाँड उभारणी महत्त्वाची - योगी आदित्यनाथ 

जलयुक्त शिवारची चौकशी , सत्य बाहेर येईल
आकसाने व सुडाने लावलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काही संबंध नाही. अखेरीच या चौकशीतून सत्यच बाहेर येईल असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. या कामाचे नियोजन आणि कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात होती. मुख्यमंत्र्यांचा याच्याशी दुरान्वये संबंध नाही, तथापि या योजनेचे अपयश दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून होत आहे. त्यामुळे या प्रकारच्या चौकशीचा काडीमात्र फरक भाजपवर किंवा फडणवीस यांच्यावर होणार नाही. चौकशीत सत्यच बाहेर येईल असेही दरेकर यांनी सांगितले.

Investigate all, bring the truth before the people Praveen Darekars challenge 

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investigate all, bring the truth before the people Praveen Darekars challenge