दिघा धरणाचा प्रश्‍न लोकसभेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

ब्रिटिश काळात बांधलेले हे धरण तुडुंब भरलेले आहे; मात्र भिंती जिर्ण झाल्याने धरण केव्हाही फुटू शकते. त्यामुळे या धरणाची दुरुस्ती करता यावी. तसेच या धरणातील पाणीही रोज वापरात यावे, यासाठी हे धरण कायमस्वरूपी महापालिकेला हस्तांतरित करावे, अशी मागणी विचारे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली. 

मुंबई : अनेक वर्षे पडीक असलेले इलठाणपाडा येथील धोकादायक धरण रेल्वे प्रशासनाने महापालिकेला हस्तांतर करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी केंद्र सरकारकडे केली. ब्रिटिश काळात बांधलेले हे धरण तुडुंब भरलेले आहे; मात्र भिंती जिर्ण झाल्याने धरण केव्हाही फुटू शकते. त्यामुळे या धरणाची दुरुस्ती करता यावी. तसेच या धरणातील पाणीही रोज वापरात यावे, यासाठी हे धरण कायमस्वरूपी महापालिकेला हस्तांतरित करावे, अशी मागणी विचारे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली. 

नवी मुंबई महापालिकेने रेल्वे प्रशासनाकडे वारंवार हे धरण हस्तांतरित करून घेण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली आहे; मात्र २० वर्षे रेल्वे प्रशासनाने यावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची खंत विचारे यांनी सभागृहात व्यक्त केली. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या धरणातील पाणी वापरण्यासाठी ३ महिन्यांकरिता रेल्वेने मंजुरी दिली होती. त्यानंतर पियूष गोयल यांचीही भेट घेऊन फोटोद्वारे वस्तुस्थिती दाखविण्यात आली होते. 

शून्य प्रहर कालावधीत चर्चा करताना खासदार राजन विचारे यांनी नुकताच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरणाची भिंत फुटून अनेक लोकांना प्राण गमवावे लागले होते. या परिस्थितीची नवी मुंबईत पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हा धरण कायमस्वरूपी नवी मुंबई महापालिकेला हस्तांतरित करावे, अशी मागणी विचारे यांनी सभागृहात लावून धरली.

२५ हजार लोकवस्तीला धोका
ब्रिटिश काळात १६५ वर्षांपूर्वी बोरीबंदर ते ठाणे या सुरू झालेल्या भारतातील पहिल्या रेल्वेच्या वाफेवरील इंजिनासाठी लागणारे पाणी या धरणातून पुरविले जात होते. कालांतराने वाफेची इंजिन बंद होऊन विद्युत इंजिन सुरू झाले. त्यामुळे या धरणाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. दुरुस्तीअभावी हे धरण धोकादायक स्थितीत आहे. धरणाकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर कोणत्याही क्षणी फुटून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राहत असलेल्या सुमारे २५ हजार लोकवस्तीला धोका होऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Digha dam in Lok Sabha