हवामानतज्ज्ञ म्हणतात, कोणताही ऋतू असो स्वच्छता हवीच!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

वाढलेल्या तापमानात कोरोनाचा विषाणू टिकणार नाही किंवा तो नष्ट होईल अशा अनेक अफवा आणि गैरसमज पसरवले गेले. मात्र, अशा गैरसमजात कोणीही राहू नये, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे

मुंबई : वाढलेल्या तापमानात कोरोनाचा विषाणू टिकणार नाही किंवा तो नष्ट होईल अशा अनेक अफवा आणि गैरसमज पसरवले गेले. मात्र, अशा गैरसमजात कोणीही राहू नये, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. सार्सबाबतही अशाच अनेक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. त्यावरून, कोरोनाबाबतचेही अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र, त्याच सार्स समूहातील कोरोना विशिष्ट रचनेमुळे (स्ट्रक्चर) कोणत्याही स्थितीत मानवी रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला करतो. त्यामुळे, सावधानता बाळगून स्वच्छतेचे नियम सर्व ऋतूंमध्ये कायमचे पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला हवामान तज्ज्ञ देतात. 

हे वाचाच : ...काय नवलच! व्हिडीओ काॅलिंगद्वारे केलं त्यांनी बाळाचं बारसं

यंदा पावसाचा अंदाजही समाधानकारक वर्तवण्यात आला असला तरीही, सध्या कडक उन्हाने नागरिक अत्यवस्थ झाले आहेत.  मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या सरासरीत आहे. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढता आहे. त्यामुळे, नागरिकांनी ऊन, पाऊस आणि थंडी अशा कोणत्याही ऋतूमध्ये स्वच्छतेचे सर्व निकष पाळलेच पाहिजे, असेही तज्ज्ञ सांगतात. 

महत्त्वाचं : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामुळे अवघी मुंबई हादारलीये! वाचा नेमकं काय झालंय...

काय आहे हवामानाचा कोरोनावरील परिणाम... 
आयआयटी वेदर स्टडीजचे प्रो. श्रीधर बालासुब्रमण्यम यांनी हवामानाचा कोरोनावरील परिणाम स्पष्ट केला आहे. सार्स समूहातील काही विषाणूंची सक्रियता कमाल तापमानात मंदावते, असे यापूर्वीचे संशोधन आहे. मात्र, कमाल तापमान आणि कोरोना यावर अद्यापही संशोधन सुरू आहे. देशात आणि राज्यात कमाल तापमान असूनही कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनावर कडक उन्हाच्या होणाऱ्या परिणामावर आताच भाष्य करणे चुकीचे ठरेल. 40 अंशांहून अधिक तापामान गेल्यास कोणत्याही विषाणूचा संसर्ग प्रसार कमी होत असल्याचे यापूर्वीचे संशोधन आहे. 

पाणी साचलेल्या ठिकाणी संसर्गाची भीती अधिक
पावसाच्या पाण्यातही वाहून जाणारा विषाणू साठलेल्या पाण्यात रेंगाळत राहतो. अशा पाण्याच्या संपर्कात आल्यास शरीरावरून विषाणूचे वहन होण्याची भीती अधिक आहे. थुंकण्यातून,‌ शिंकण्यातून आणि खोकण्यातून बाहेर पडलेले ड्रॉपलेट्स पृष्ठभागावर साठून पावसाच्या पाण्यावाटे वाहू शकतात. मात्र, पाणी साचलेल्या ठिकाणी हे विषाणू अधिक प्रमाणात साचू शकतात. त्यातून संसर्ग भीतीही अधिक असल्याची शक्यता प्रो. बालासुब्रमण्यम यांनी वर्तवली आहे.

यापूर्वीचा सार्स विषाणू समूहातीलच कोरोना विषाणू आहे. त्याची रचना वेगळी असल्याने मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीवर तो हल्ला करत आहे. हवामान आणि कोरोना संबंध यावर संशोधन सुरू असून ते जगासमोर येणे बाकी आहे. त्यामुळे, नागरिकांनी तिन्ही ऋतूंमध्ये स्वच्छता आणि काळजी घेणे गरजेचे आहे. 
- प्रो. श्रीधर बालासुब्रमण्यम, वेदर स्टडीज, आयआयटी, मुंबई

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is rumored that the corona virus will survive the increased temperature. However, the weather experts said cleanliness is needed