esakal | आयटीआय प्रवेश प्रक्रियेला शिक्षण मंडळाच्या निर्णयाची प्रतिक्षा

बोलून बातमी शोधा

exam
आयटीआय प्रवेश प्रक्रियेला शिक्षण मंडळाच्या निर्णयाची प्रतिक्षा
sakal_logo
By
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई: दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्यांना गुण अथवा श्रेणी कशी दिली जाईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. राज्य व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील खासगी आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश प्रक्र‍िया सुरू करण्यासाठी वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे.

राज्यात प्रत्येक वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच राज्यातील खासगी आणि शासकीय आयटीआयमधील उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या ट्रेडसाठी प्रवेश प्रक्र‍िया सुरू केली जाते. आयटीआयमधील कौशल्यविकासावर आधारीत असलेल्या ट्रेडसाठीचे प्रवेश दहावीच्या गुणवत्तेवर दिले जातात. यंदा कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्यासाठी कोणते निकष गुण आणि श्रेणीसाठी लावले जातील हे अजूनही स्पष्ट करण्यात आले नसल्याने आयटीआयकडून आपली प्रवेश प्रक्रिया तुर्तास लांबणीवर टाकण्यात आली आहे.

शिक्षण मंडळाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर प्रवेशाचे वेळापत्रक आणि त्याच्या नियोजनाचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याची माहिती राज्य व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

राज्यात सध्या राज्य व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत खासगी 502 आणि शासकीय 417 आयटीआय असून यात प्रामुख्याने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे तांत्रिक ट्रेड उपलब्ध आहेत. मागील काही वर्षांत आयटीआयच्या प्रवेशासाठी लाखो विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उपलब्ध जागांहून दुपटीने अधिक विद्यार्थी आपल्याला प्रवेश मिळावा म्हणून अर्ज करत असतात. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे गुण आणि श्रेणी दिली जाईल, त्यानंतर आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेचे चित्र स्पष्ट होणार आहे

(संपादन - दीनानाथ परब)