उद्यापासून परीक्षा; ITIचे प्रशिक्षणार्थी, शिक्षक लोकल प्रवासाच्या प्रतिक्षेत

तेजस वाघमारे
Sunday, 22 November 2020

दहावी बारावी फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली असतानाच आयटीआयचे शिक्षक आणि प्रशिक्षणार्थी लोकल प्रवास करण्यास परवानगी मिळावी यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.

मुंबई: दहावी बारावी फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली असतानाच आयटीआयचे शिक्षक आणि प्रशिक्षणार्थी लोकल प्रवास करण्यास परवानगी मिळावी यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. सोमवारपासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार असून या परीक्षेला पोचण्यासाठी हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

राज्यातील आयटीआय 15 ऑक्टोबरपासून सुरू झाले. त्यानुसार राज्य सरकारने शिक्षक आणि प्रशिक्षणार्थीना लोकल प्रवासाची परवानगी दिली. मात्र अद्यापही रेल्वेने आयटीआयच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थीना लोकल प्रवासाला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थी आणि शिक्षकांचे प्रवासादरम्यान हाल होत आहेत. यामुळे प्रशिक्षणार्थीचे प्रात्यक्षिक होऊ शकलेले नाही. यातच 2018-19 मध्ये प्रवेश झालेल्या प्रशिक्षणार्थीची परीक्षा सोमवार ( ता.23) पासून सुरू होत आहे. या परीक्षेचे हॉल तिकीटही प्रशिक्षणार्थीना शनिवारी उशिरा मिळाले. यामुळे प्रशिक्षणार्थी गोंधळात असतानाच आता प्रशिक्षणार्थी आणि शिक्षकांना परीक्षा केंद्रांवर कसे पोहोचायचे असा प्रश्न पडला आहे.

अधिक वाचा- कोरोनाच्या लढाईत टाटा ग्रुपचा सहभाग, मुंबईत उपलब्ध करून देणार तपासणी केंद्र

आयटीआयचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रवासाची मुभा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट आयटीआय या संघटनेने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून या बद्दल कळवले असता त्यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी विनंती केल्यास त्यावर विचार केला जाईल असे कळवले होते. त्या संदर्भात असोसिएशनने मुख्य सचिव यांना ईमेल द्वारा कळवले. परंतु आजतागायत यावर तोडगा निघाला नाही. यामुळे प्रशिक्षणार्थी, शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा नसल्याने शिक्षकांची गैरसोय होत आहे.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

ITI trainees teachers waiting for local travel exams from Monday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITI trainees teachers waiting for local travel exams from Monday