कोरोनाच्या लढाईत टाटा ग्रुपचा सहभाग, मुंबईत उपलब्ध करून देणार तपासणी केंद्र

मिलिंद तांबे
Sunday, 22 November 2020

मुंबईत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून टेस्टिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर कोलकाता, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली जाईल.

मुंबई: कोरोना चाचण्या करण्यासाठी टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्सने पुढाकार घेतला आहे. टाटा एमडी ही जगातील पहिली क्रिस्पर कॅस-9 वर आधारित डायग्नोस्टिक टेस्ट करून देशभरात कोरोना तपासण्या करण्यास  मदत करणार असून या कामात अपोलो समूह देखील सहकार्य करणार आहे.

मुंबईत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून टेस्टिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर कोलकाता, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली जाईल. त्यापुढील टप्प्यात देशातील इतर शहरांमध्ये देखील ही तपासणी उपलब्ध होईल. फेलूदा तंत्रज्ञानावर आधारित टाटाएमडी चेक ही जगातील पहिली कोविड19 डायग्नॉस्टिक्स टेस्ट आहे जी डीएनए जेनोम एडिटिंग टूल क्रिस्पर कॅस-9 वर आधारित आहे. माफक दरात या चाचण्या करण्यात येणार आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन आणि औषध महानियंत्रक संस्था अर्थात डीसीजीआयने मान्यता दिली आहे. ही चाचणी विषाणू आहे अथवा नाही हे तपासणारी चाचणी असून अचूकता आणि तातडीने निष्कर्ष देण्याची क्षमता यामध्ये आहे. पहिल्या टप्प्यामध्ये टेस्टिंग सुविधा 8 रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. मागणीचा ओघ आणि इतर ठिकाणी विस्तार करण्याची गरज यांचा आवाका लक्षात घेऊन ठिकठिकाणी प्रमाण वाढवले जाईल. या सर्व शहरांमधील प्राथमिक आरोग्यसेवा क्लिनिक्स आणि डायग्नॉस्टिक्स लॅब्स आणि कलेक्शन सेंटर्सचे नेटवर्क या उपक्रमामध्ये नमुने गोळा करणे, रुग्णांच्या घरून नमुने आणणे आणि तपासणी यामध्ये मदत करणार आहे.

अधिक वाचा- मुंबईत कोरोनाची स्थिती पुन्हा चिंताजनक? कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय

अपोलो हेल्थ अँड लाइफस्टाइल लिमिटेडच्या देशभरात पसरलेल्या नेटवर्कमध्ये 15 राज्यामध्ये मिळून 100 पेक्षा जास्त क्लिनिक्स, 75 प्रयोगशाळा आणि 600 पेक्षा जास्त कलेक्शन सेंटर्स आहेत.  रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी आणि तपासणीची उपलब्धता वाढवण्याची गरज लक्षात घेऊन या नेटवर्कचा उपक्रमातील उपयोग वाढवला जाईल.

यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. तसेच यामध्ये किमान बॅच आकाराची मर्यादा नसल्यामुळे तपासण्यांची संख्या क्षमता देखील वाढेल. सेन्सर्सचा वापर करून कीट्सच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवले जाईल.  त्याचप्रमाणे एआयवर आधारित रिझल्ट कॅप्चर आणि अनालिसिस टूलमुळे प्रयोगशाळांना इमेज-बेस्ड परिणाम मिळतील. त्यामुळे नमुने कुठून आले, कुठे पोहोचवले गेले अशी संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. शिवाय तपासणीचे परिणाम कुठूनही पाहता येतील. यामुळे रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

तपासण्याच्या ताफ्यामध्ये टाटाएमडी चेकचा समावेश झाल्यामुळे देशात वैश्विक महामारीच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईला अधिक जास्त बळ प्राप्त झाले आहे.  कोविड टेस्टिंग क्षेत्रातील क्रांतिकारी सुधारणा बनण्याची क्षमता असलेल्या या उपक्रमात टाटा ग्रुपसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. संगीता रेड्डी यांनी सांगितले.

अधिक वाचा-  भारती सिंग पाठोपाठ पती हर्ष लिंबाचियालाही NCBकडून अटक, 18 तास चौकशी

वैश्विक महामारीच्या विरोधात देशात सुरु असलेल्या लढाईमध्ये योगदान देण्याचा हा प्रयत्न आहे. यामध्ये प्रतिबंधात्मक प्रयत्न, मोठ्या प्रमाणावर तपासण्या आणि सर्वसमावेशक काळजी यांचा समावेश आहे.  आज आपण सर्वजण आपले सर्वसामान्य जीवन पुन्हा सुरु करत आहोत तेव्हा ही सुविधा अतिशय लाभदायक ठरेल असा विश्वास टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्सचे सीईओ आणि एमडी गिरीश कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केला.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Tata group involvement battle against Corona testing centers made Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tata group involvement battle against Corona testing centers made Mumbai