मोखाडा - पाणी टंचाईचा दुष्काळ नष्ट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून 'जलजीवन मिशन' योजना आखली आहे. ग्रामीण भागातील महिलेच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवण्यासाठी शाश्वत पाणी साठ्यावरून ही नळपाणीपुरवठा योजना करण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन, टंचाई ग्रस्त गावपाडे टॅकर मुक्त करण्याचा ध्यास शासनाने घेतला आहे.
2024 पर्यंत ही कामे पुर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागात समन्वयाचा अभाव तसेच शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने जलजीवन मिशन योजनेची कामे खोळंबली आहे. त्यामुळे यावर्षी ही सरकार च्या लाडक्या बहिणीच्या डोक्यावर हंडा कायम राहणार असुन त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.
प्रतिवर्षी ग्रामीण भागाला पाणी टंचाई च्या झळा जाणवतात. टंचाई काळात महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी 'हर घर नल से जल' चा नारा देऊन, शाश्वत पाणी साठ्यावरून 'जलजीवन मिशन' योजना केंद्र आणि राज्य सरकार ने आणली आहे. सन 2053 पर्यंत ची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेऊन ही महत्त्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली आहे.
सदरची योजना पुर्ण करण्याचे उद्दिष्ट मार्च 2024 पर्यंत चे ठेवण्यात आले होते. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग या यंत्रणा नियुक्त करण्यात आल्या. मात्र, वेळेत कामे पुर्ण न झाल्याने, जिल्ह्यात सर्वच तालुक्यात नळपाणी पुरवठा योजना अपुर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे आदिवासी तालुक्यांमध्ये भिषण पाणी टंचाई निर्माण होत आहे.
पालघर जिल्ह्यात पाणी टंचाई बाबत अतिसंवेदनशील मोखाडा तालुका आहे. येथे शाश्वत पाणी साठ्यावरून मुख्य जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र आणि पाण्याच्या टाक्या बांधण्याचे कंत्राट उल्हासनगर च्या ईगल ईन्फ्रा कंपनीला देण्यात आले आहे. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे नियंत्रण आहे.
मात्र, आजमितीस त्यांचे काम पुर्ण झालेले नाही. त्याचा परिणाम म्हणून गावपाड्यांतील नळपाणी पुरवठा योजनेचे विस्तारीकरण रखडले आहे. तालुक्यात विस्तारीकरणाच्या 55 नळपाणी पुरवठा योजना करण्यात येत आहेत. यातील बहुतांश योजना अपुर्ण आहे. त्यावर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे नियंत्रण आहे.
दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागात समन्वयाचा अभाव असल्याचा फटका या योजनेला बसला आहे. मुख्य नळपाणी पुरवठा योजना, वेळेत पुर्ण करण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठांच्या अखत्यारीतील विस्तारित नळयोजना अपुर्णावस्थेत आहेत.
त्यातच ज्या कंत्राटदारावरांनी 65 ते 70 टक्के कामे केली आहेत, त्यांची चालु बिले, निधी उपलब्ध नसल्याने जिल्हा परिषदेकडे थकली आहेत. बिले थकल्याने कंत्राटदार संघटनेने 10 जानेवारीला काम बंद करण्याचा ईशारा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून मोखाड्यासह जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमधाये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
यंदा नळपाणी पुरवठा योजना पूर्णत्वास येतील, अशी अपेक्षा सरकार च्या लाडक्या बहिणींना होती. मात्र, त्यांची आशा फोल ठरली आहे. तालुक्यात पंधराहुन अधिक गावपाडे पाणी टंचाई ने होरपळले आहेत. त्यामुळे यंदाही लाडक्या बहिणींच्या डोक्यावर हंडा कायम राहीला असुन त्यांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत रहावे लागणार असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.