esakal | जंजिरा किल्ला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही प्रवासी वाहतुकीसाठी बंद
sakal

बोलून बातमी शोधा

जंजिरा किल्ला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही प्रवासी वाहतुकीसाठी बंद

रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी 13 नोव्हेंबरला पुरातन वास्तु पर्यटकांसाठी खुल्या केल्या असल्या तरी मात्र दिवाळीच्या कार्यालयांना सलग सुट्टया असल्यामुळे प्रवासी बोट वाहतुकदारांना याचा फटका सहन करावा लागत आहे.

जंजिरा किल्ला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही प्रवासी वाहतुकीसाठी बंद

sakal_logo
By
मेघराज जाधव

मुंबईः रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी 13 नोव्हेंबरला पुरातन वास्तु पर्यटकांसाठी खुल्या केल्या असल्या तरी मात्र दिवाळीच्या कार्यालयांना सलग सुट्टया असल्यामुळे प्रवासी बोट वाहतुकदारांना याचा फटका सहन करावा लागत आहे. जोडून सुट्टया घेऊन आलेल्या पर्यटकांना किल्ला न पाहताच परतावे लागल्याने तीव्र नाराजी पाहावयास मिळते आहे.

जंजिरा किल्ल्यावर राजपुरी येथुन 13 शिडाच्या बोटींसह दोन यांत्रिकी नौका तैनात आहेत. मात्र परवाने नूतनीकरण  आणि प्रवासी विमा यांची तांत्रिक कारणांमुळे पूर्तता न झाल्याने प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे .

जरी जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ला खुला केला असला तरी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाची कार्यवाही पूर्ण न झाल्याने सध्या किल्ला बंद असून पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला नाही. दिवाळी सुट्टी असल्याने महाराष्ट्रातील विविध भागातून पर्यटक हा किल्ला पहाण्यासाठी येत आहेत. मात्र वाहतूक व्यवस्था बंद असल्याने पर्यटक नाराज होऊन माघारी जात आहेत. 

याबाबत  पुरातत्व खात्यांच्या अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने आम्हाला  किल्ल्यावरील जल वाहतूक सुरु करणार आहोत असे लेखी कळवलेले नाही. त्यामुळे आम्हाला किल्ल्यातील स्वच्छता तसेच ऑनलाईन तिकीट व्यवस्था करण्याची अंमलबजावणी सुद्धा करता आलेली नाही. मेरी टाइम बोर्ड आम्हाला ज्यावेळी कळवेल त्यावेळी आम्ही आमचे काम तातडीने सुरु करणार आहोत.

अधिक वाचा-  मधुमेह, स्वादुपिंड, लठ्ठपणा, उच्च रक्तदाबामुळे मुंबईत कोविड 19 चे अधिक बळी

महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे राजपुरी आगरदांडा विभागाचे बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी यांनी सांगितले की, जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करणाऱ्या 13 शिडाच्या बोटी आणि दोन यांत्रिक बोटींचे नूतनीकरण झालेले नाही. शिवाय प्रवाशी विमा सुद्धा काढलेला नाही. या बाबी पूर्ण होताच तातडीने किल्ल्यावरील जलवाहतूक सुरु करण्यात येईल.

तर वेलकम जल वाहतूक सोसायटीचे चेअरमन जाविद कारभारी यांनी सांगितले की, बोटींचे परवाने नूतनीकरण करण्यासाठी मेरी टाईम बोर्डाकडे दिड महिन्यापूर्वीच प्रकरणे सादर करण्यात आली असुन प्रवासी विमा काढण्याची प्रक्रियाही सुरु आहे. गेल्या सात महिन्यांपासून किल्ला बंद आहे. त्यामुळे  रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी किल्ला खुला केला आहे. जल वाहतुकीच्या प्रक्रिया आपण लवकरच पूर्ण करू मात्र जलवाहतूक सुरु करा अशी विनंती त्यांनी केली आहे.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Janjira fort closed for passenger traffic even after Collector order