"आणखी दहा वर्षे मिळाली असती तर जयवंत दळवींनी चमत्कार केला असता"

Madhu mangesh Karnik
Madhu mangesh Karnikgoogle
Updated on

मुंबई : नाटककार जयवंत दळवी (Jaywant dalavi) यांना आणखी दहा वर्षे मिळाली असती तर त्यांनी चमत्कार केले असते, एवढे त्यांच्या लेखणीत (professional writing) सामर्थ्य होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक (madhu manghesh karnik) यांनी दळवी यांच्या स्मृतीदिनी (Death anniversary) काढले.

Madhu mangesh Karnik
'KRK' च्या याचिकेवर सलमान खानने खुलासा करावा - उच्च न्यायालय

कोकण मराठी साहित्य परिषद व आरती आर्ट अकादमी यांच्यातर्फे आयोजित दळवी यांच्या स्मृतीदिन समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. दळवी हे माणसांवर प्रेम करत होते, त्याचमुळे आमचे नाते जुळले. हे कोणी शिकवत नाही तर ते अंतःकरणातून उपजत यावे लागते. दळवींच्या अक्षरातून माणूस पाझरत असे, गरीब, निसर्ग, जग, स्त्री यांच्यावरील प्रेम पाझरत असे.

आई म्हणून ते साऱ्या स्त्रीयांकडे पहात असत. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांमधील त्यांचे स्त्री वरचे निरीक्षण, हे अनेक स्त्रीवादी लेखिकांना जमले नाही. त्यांच्या पुरुष नाटकाने महाराष्ट्रातील स्त्री मन हादरून गेले. त्यांच्या अक्षरांनी जसे महाराष्ट्राला हसवले तसेच रडवले देखील. हे लेखकाचे गारूड असते, साहित्याला शाळा नसते, साहित्याला फक्त आकाश आणि भूमि ठाऊक असते, माणसाचा प्रवास ठाऊक असतो. माणसाचा आजवरचा प्रवास दळवी पहात होते, त्यांना तो कळला होता, त्यावर ते लिहीत होते, अशी आठवण कर्णिक यांनी सांगितली.

दळवी यांना कमी आयुष्य मिळाले, त्यांना आणखी दहा वर्षे मिळाली असती तर त्यांनी चमत्कार केला असता, एवढे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत होते, मनाचा मोठेपणा होता. दळवी हा काम करणारा माणूस होता, तो बोलणारा माणूस नव्हता. मात्र त्याने लहानमोठी अनेक माणसे जोडली, आबालवृद्धांवर प्रेम केले, असे सांगताना कर्णिक यांनी दळवी यांच्या अंत्ययात्रेचा किस्सा सांगितला. दळवी यांचे अंत्यदर्शन घेताना स्तब्ध उभे राहिलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या डोळ्यातील दोन अश्रू मी पाहिले आहेत. ठाकरे यांचे कलावंताचे हृदय होते व त्यांचे अश्रू हेच दळवी यांचे सामर्थ्य होते. लोकांना हसवणे हे त्यांचे सामर्थ्य होते, प्रेमाशिवाय माणसे जोडता येत नाहीत. अशा दळवींच्या स्मृती जागवणे हे आपले कर्तव्य आहे, असे गौरवोद्गारही कर्णिक यांनी काढले.

Madhu mangesh Karnik
BMC : उद्या फक्त महिलांसाठी कोविड 19 विशेष लसीकरण

माणसांवर विलक्षण प्रेम करणारा हा माणूस मरणाच्या जवळ आलेला असतानाही जगण्यावर प्रेम करत होता, अशी आठवण नाटककार गंगाराम गवाणकर यांनी यावेळी सांगितली. तर साहित्य हे समाजाला घडवीत असते, समाज घडवण्यात साहित्यनिर्मिती महत्वाची असते. सामाजिक जागृती करून माणसाला आणि समाजाला जागवण्याचे काम दळवी यांनी केले, असे लेखिका रेखा नार्वेकर म्हणाल्या. लिहिताना औचित्य सांभाळणे महत्वाचे आहे, ही दळवींनी दिलेली शिकवण मी कायमच पाळली आहे, असे नाटककार संभाजी सावंत म्हणाले.

त्यांना माणसाचे मन जाणता येत होते, हाच त्यांच्या लेखनाचा गाभा होता. रसिकांच्या काळजापर्यंत आपला शब्द पोहोचला पाहिजे ही त्यांची नाटक लिहितानाची भूमिका होती. त्यांच्या साहित्यावर कोणाचीही मुद्रा उमटली नसली तरी त्यांनी साहित्यविश्वावर आपली मुद्रा उमटवली, असे लेखिका नमिता कीर म्हणाल्या. यावेळी इंद्रसेन चव्हाण, अनुराधा नेरुरकर हजर होते.

कार्यक्रमांना सवलत का नाही ?

बोरीवलीच्या या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात नाटकांसाठी केवळ निम्मे भाडे आकारले जाते. तरी हा आजचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या साहित्यिक संस्थांच्या कार्यक्रमांना या नाट्यगृहात पूर्ण भाडे का आकारले गेले, असा प्रश्न ज्येष्ठ नाट्यकलाकार प्रदीप कबरे यांनी केला. दळवी हे नाटककार होते ही गोष्ट महापालिका प्रशासन विसरले का, असे विचारून कबरे म्हणाले की पूर्ण भाडे आकारले याचे दुःख नाही पण पालिका अधिकाऱ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांची जाण नाही हे दुःखदायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com