दागिन्यामुळे उकलले वृद्धेच्या हत्येचे गूढ 

प्रमाेद जाधव
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

प्रभावती म्हात्रे यांची हत्या झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. अनेक तर्कवितर्क लढवले गेले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक जे. ए. शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली, त्यावेळी ही घटना चोरीच्या उद्देशाने झाल्याचे लक्षात आले. पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा सागरी पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यानंतर तपास सुरू केला. ही हत्या बाहेरील व्यक्तीने केल्याचा अंदाज त्यांना आला. त्यामुळे त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. 

अलिबाग : आवास येथील प्रभावती म्हात्रे (86) या वृद्ध महिलेच्या हत्येची घटना 1 सप्टेंबरला उघडकीस आली होती. चोरट्यांनी घरातील दागिनेही लंपास केले असल्याने पोलिसांसमोर आरोपीला अटक करण्याचे मोठे आव्हान होते. परंतु ते स्वीकारून अवघ्या तीन दिवसांत हत्या करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या घरात पडलेल्या एका दागिन्यामुळे या घटनेचे गूढ उकलले. 

प्रभावती म्हात्रे यांची हत्या झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. अनेक तर्कवितर्क लढवले गेले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक जे. ए. शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली, त्यावेळी ही घटना चोरीच्या उद्देशाने झाल्याचे लक्षात आले. पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा सागरी पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यानंतर तपास सुरू केला. ही हत्या बाहेरील व्यक्तीने केल्याचा अंदाज त्यांना आला. त्यामुळे त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. 

अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत आवास परिसरात व्यवसायानिमित्त बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली. या तपासात कुबरे ऊर्फ मोबाईल अजोरा पांडे हा रात्रीपासून पसार असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी मोर्चा त्याच्या घराकडे वळवला. त्यावेळी त्याच्या घरात कानातील एक सोन्याचा दागिना सापडला. घरात रक्तही पडलेले दिसले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. 

कुबरेपर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांनी त्याचे नातेवाईक आवासमध्ये असल्याची माहिती घेतली. त्यावेळी त्याचा भाचा सापडला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली, त्यावेळी कुबरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने उत्तर प्रदेशमधून त्याला जेरबंद केले. पोलिसांनी हिसका दाखवताच तो पोपटसारखा बोलू लागला. पैशांसाठी त्याने खून केल्याचे कबूल केले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके अधिक तपास करीत आहेत. 

गावाला जाण्यासाठी गुन्हा 
कुबरे ऊर्फ मोबाईल अजोरा पांडे हा मुळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. 15 वर्षांपूर्वी तो व्यवसायानिमित्त आवास येथे राहत होता. मजूर म्हणून काम करणे, मका विकणे अशा अनेक प्रकारची कामे तो करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. पैशांसाठी त्याने गावातील एका व्यक्तीची सायकल चोरून आणली होती. त्यामुळे घर मालकाने त्याला घर सोडून उत्तर प्रदेशमधील गावी जाण्यास सांगितले होते. मात्र, त्याच्याकडे गावी जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने घरापासून काही अंतरावर एकट्याच राहत असलेल्या प्रभावती म्हात्रे यांची हत्या करण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या प्रभावती यांची उशीने गळा दाबून हत्या केली. दागिने आणि रोख रक्कम असा 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून तो पसार झाला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A jewelry that was found in the accused's home solved the mystery of the incident.