प्लास्टिकमुक्त रायगडची फक्त घोषणाच; जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्रास वापर; जिल्हा प्रशासनापासून स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रमोद जाधव
Tuesday, 22 September 2020

प्लास्टिकचा सर्रास वापर होत आहे. स्थानिक प्रशासनापासून ते जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्लास्टिकमुक्त रायगडची घोषणा फक्त कागदावर असल्याचे दिसून आले आहे

 

अलिबाग : प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाच्या समतोलासह मानवी आरोग्यावरही त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. त्यामुळे सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली होती. सुरुवातीला या मोहिमेला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु काही महिन्यांपासून त्याचा सर्रास वापर होत आहे. स्थानिक प्रशासनापासून ते जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्लास्टिकमुक्त रायगडची घोषणा फक्त कागदावर असल्याचे दिसून आले आहे.

NCBच्या जबाबात रिया चक्रवतीचे खळबळजनक विधान; सारा अली खानने सुशांतसोबत हेवी डोस घेतल्याचा खुलासा

प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासूनच त्याची सुरुवात करण्यात आली. प्लास्टिक बाटल्याऐवजी तांबे, स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करण्यास सुरुवात झाली. ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या वतीने प्लास्टिकबंदीसाठी ठिकठिकाणी बॅनर लावून प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. व्यापारी व अन्य दुकानदार, मासळी व भाजीविक्रेत्यांच्या बैठका घेऊन प्लास्टिक न वापरण्याबाबत आवाहन केले. रायगड जिल्ह्यातील नागरिकांकडूनही या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा व स्थानिक प्रशासनाने राबवलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांनी प्लास्टिकऐवजी कापडी पिशवींचा वापर करण्यास सुरुवात केली. 

जिल्ह्यातील अनेक दुकांनामध्ये पाच व दहा रुपयांना कापडी पिशवी विक्रीही मोठ्या प्रमाणात केली. काही ठिकाणी कागदी पिशवीचा वापरही दुकानदारांकडून करण्यात आला. प्रशासनाकडून प्लास्टिकबंदीची राबवलेली मोहीम कौतुकास्पद असली, तरीही काही महिन्यांपासून प्लास्टिक पिशवीचा पुन्हा वापर सुरू झाला आहे. 

खासगीत पॉझिटिव्ह अन सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह; विश्वास कोणत्या अहवालावर ठेवायचा? रुग्णासमोर प्रश्न

मासळी विक्रेत्यांपासून भाजीविक्रेते, तसेच काही दुकानांमध्येही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता असताना, नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

प्लास्टिकच्या वापरामुळे कर्करोगसारखे आजार होत असून, अन्य आजारालाही बळी पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा वापर जास्त करू नये. प्लास्टिकमधील खाद्य पदार्थही खाऊ नये.
- डॉ. सुहास माने,
 जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

 

प्लास्टिकबंदीसाठी प्रशासनाकडून चांगली मोहीम राबवली होती; परंतु कोरोनामुळे याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्थिरस्थावर झाल्यावर प्लास्टिकमुक्तीसाठी कार्यवाही केली जाईल. नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा.
- निधी चौधरी,
जिल्हाधिकारी, रायगड

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Just the announcement of a plastic free Raigad its not reality