KDMC Illegal Construction : केडीएमसीतील बेकायदा बांधकामे जोरात

अनधिकृत बांधकामांना अभय दिले जाणार नाही असे एकीकडे प्रशासकीय अधिकारी बोलत असले तरी केडीएमसी हद्दीत राजरोसपणे बेकायदा बांधकामे जोरात सुरु आहेत.
KDMC Illegal Construction
KDMC Illegal Constructionsakal
Summary

अनधिकृत बांधकामांना अभय दिले जाणार नाही असे एकीकडे प्रशासकीय अधिकारी बोलत असले तरी केडीएमसी हद्दीत राजरोसपणे बेकायदा बांधकामे जोरात सुरु आहेत.

डोंबिवली - अनधिकृत बांधकामांना अभय दिले जाणार नाही असे एकीकडे प्रशासकीय अधिकारी बोलत असले तरी केडीएमसी हद्दीत राजरोसपणे बेकायदा बांधकामे जोरात सुरु आहेत. काही बेकायदा बांधकामांवर पालिकेकडून बुलडोझर फिरविला जातो. भूमाफियांकडून अडवणूक झाल्यास तात्काळ पोलिस फौजफाटा, वाहतूक पोलिस यांची मदत घेत तात्काळ कारवाई केली जाते. मात्र काही ठराविक बांधकामांना पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याचे सांगत कारवाई टाळली जाते.

डोंबिवलीतील बेकायदा बांधकामे याचे जिवंत उदाहरण आहेत. पश्चिमेतील कुंभारखान पाडा येथील बांधकामावर भूमाफियांकडून अडवणूक झाली तरी वाहतूक पोलिसांची तात्काळ मदत घेत कारवाई करण्यात आली. पूर्वेतील गावदेवी मंदिर जवळील बेकायदा बांधकामास मात्र पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने सहा ते सात वेळा कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. या इमारतीत तर आता एका संस्थेचे कार्यालय देखील सुरु झाले आहे. हे पाहता पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कल्याण डोंबिवली शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट वाढतच आहे. 65 बेकायदा बांधकामांचा तपास सुरु होऊनही भूमाफिया मात्र बिनधास्त बांधकामे उभारत आहेत. राजकीय पाठबळ आणि पालिका प्रशासनाकडून मुद्दाम होणारी डोळेझाक यामुळे भूमाफियांचे चांगलेच फावले आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई होत असल्याचे एकीकडे पालिकेकडून दाखविले जात आहे, तर दुसरीकडे मात्र हेच पालिका अधिकारी काही ठराविक बांधकामांवरील कारवाईत मात्र फारसे लक्ष घालताना दिसत नाहीत.

डोंबिवली शहरातच याची उदाहरणे दिसून येतात. डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा येथील बेकायदा इमारतीवर कारवाईसाठी गेलेला पालिकेचा ताफा भूमाफियांनी रस्त्यात वाहने उभी करुन अडविला होता. वाहतूक पोलिसांची मदत घेत प्रशासनाने या गाड्या हटवून इमारतीवर कारवाई केली. तब्बल 5 तास माफियांनी पालिका अधिकाऱ्यांना रखडवून ठेवले होते. मात्र अधिकाऱ्यांनी देखील माघार न घेता कारवाई केली. एकीकडे अधिकाऱ्यांची ही चांगली कामगिरी दाखविताना दुसरीकडे पूर्वेतील गावदेवी मंदिरा जवळील बेकायदा इमारतीवर मात्र पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने तब्बल सहा ते सात वेळा कारवाई ही पुढे ढकलण्यात आली आहे.

बेकायदा बांधकाम सुरु असल्याचे माहित असूनही पालिका अधिकारी हे बांधकाम रोखू शकलेले नाही. या कालावधीत भूमाफियांनी इमारतीचे सात मजली बांधकाम पूर्ण करुन घेतले आहे. इमारतीचे बरेचसे काम हे पूर्ण झाले असून खालील दोन मजल्यावर एका संस्थेचे कार्यालय देखील थाटले गेले आहे. बेकायदा बांधकाम असल्याची माहिती असून देखील संस्थाचालक या इमारतीत आपले कार्यालय सुरु करत असल्याने त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे कार्यालय कारवाई टाळता यावी म्हणून सुरु करण्यात आले आहे का? अशी देखील चर्चा सुरु आहे.

मंगळवारी या इमारतीवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाचा ताफा जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

याविषयी अधिक काही माहिती देता येणार नाही असे उत्तर पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील यांनी सांगितले.

वास्तूविशारद संदीप पाटील यांनी सर्वच बेकायदा इमारत बांधकामावर कारवाई करण्यात यावी. कोणत्याही बेकायदा बांधकामांना अभय देण्यात येऊ नये. गावदेवी मंदिर जवळील बगिचाचे आरक्षण असताना देखील त्या जागेवर बेकायदा इमारत बांधण्यात आली असून त्यावर कारवाई व्हावी याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई होत असल्याचे प्रशासनाकडून दाखविले जाते. लहान मोठ्या चाळी, इमारती, बेकायदा गाळे त्यातही शहरातील ठराविक विभाग यापलिकडे कारवाईची मजल पालिकेची गेलेली नाही. काही बांधकामांवर दोनदा कारवाई करुनही ती बांधकामे बिनदिक्कत उभी राहून त्यात नागरिक देखील वास्तव्यास आले आहेत. एकदा नागरिक रहाण्यास आल्यानंतर पालिका कारवाई टाळता येते ही शक्कल भूमाफियांच्या लक्षात आल्याने बांधकाम उभारणी सुरु असतानाच भूमाफिया तेथे कामगारांना तसेच बेघर नागरिकांना काही काळ इमारतीत वास्तव्य करण्यास देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com