कल्याण-डोंबिवलीत ध्वनिप्रदूषणाची वाढती चिंता 

कल्याण-डोंबिवलीत ध्वनिप्रदूषणाची वाढती चिंता 

ठाणे : तुम्ही रस्त्यावरून वाहनाने जात आहात, समोर वाहनांच्या रांगा लागल्याने तुमचे वाहन थांबले आहे, त्यात पाठीमागील वाहनाने विनाकारण सतत हॉर्न वाजविल्यास तुम्हाला त्या आवाजाचा त्रास जाणवतो...हा केवळ वाहनचालकांचा नाही तर पादचाऱ्यांचाही अनुभव आहे. कर्णकर्कश हॉर्न किंवा सततचा कानावर पडणारा हॉर्नचा आवाज यामुळे केवळ श्रवण क्षमतेवर परिणाम होत नाही, तर मानसिक ताण, चिडचिड, डोकेदुखी हेही त्रास नागरिकांना अधिक जाणवत असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणने आहे. 

ध्वनिप्रदूषणाची वाढती पातळी ही कल्याण-डोंबिवली शहरात गंभीर समस्या झाली आहे. वाहनचालकांकडून विनाकारण वाजवले जाणारे हॉर्नही या प्रदूषणास हातभार लावतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यसरकारने कायद्यात तरतूद केली असली तरी, या कायद्याचे पालन कुठेही होताना दिसत नाही. हॉर्न वाजविण्याचे सगळे संकेत मोडून केव्हाही आणि कितीही वेळा हॉर्न वाजविले जातात.

वाहतूक पोलिस याविरोधात कारवाई करत असले तरी ती कारवाई तोकडी पडत असल्याचे दिसते. ध्वनिप्रदूषणामुळे केवळ पर्यावरणाचा समतोल ढासळत नसून मानवी आरोग्यावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. ध्वनिप्रदूषणाने केवळ श्रवण क्षमतेवरच परिणाम होत नसून ताण तणाव, चिडचिडेपणा, रक्तदाब, डोकेदुखी या शारीरिक त्रासालाही नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणने आहे. 

याबाबत डॉ. आशिष पाटील म्हणाले, दुचाकीवरून प्रवास करणारे नागरिक मुख्यतः डोकेदुखी, तणाव, श्वासोच्छवासात अडथळा अशा समस्या घेऊन येतात. या समस्यांचे मूळही ध्वनिप्रदूषण असू शकते. वाहतूक कोंडीतून प्रवास करताना सतत कानावर पडणाऱ्या आवाजाने हे त्रास होत असतात.

तर तीव्र आवाजामुळे हृदयाची धडधड वाढणे, उच्च रक्तदाब, चिडचिडेपणा, थकवा नागरिकांना जाणवतो. सामान्यतः या त्रासाची कारणे नागरिकांच्या पटकन लक्षात येत नाहीत. परंतु असे त्रास जाणवत असल्याने तीव्र आवाजापासून आपल्या शरीराचा बचाव कसा करता येईल याची त्यांनी काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे डॉ. चंद्रकांत देशपांडे यांनी सांगितले. 

वाहतूक पोलिसही त्रस्त 
नागरिकांसोबतच वाहतूक नियंत्रण करणारे पोलिसांनाही हॉर्नचा त्रास होतो. 8 ते 12 तास आम्ही कर्तव्य बजावतो. वाहतूक नियंत्रण करीत असताना वाहनांच्या सततच्या हॉर्नचा आम्हालाही त्रास होतो. काम संपल्यानंतरही आमच्या कानात सतत तोच आवाज घुमत असतो. चिडचिड प्रचंड होते आणि तो राग कुटुंबावर निघतो. सरकारच्या वतीने आरोग्य तपासणी केली जाते. यात अनेकांना रक्तदाब, मधूमेह, चिडचिडेपणा, झोप न येणे या समस्या असल्याचे निदर्शनास आले असल्याचे वरिष्ठ हवालदार अप्पासाहेब चव्हाण यांनी सांगितले. 

सततच्या ध्वनिप्रदूषणाला सामोरे गेल्यास वयपरत्वे बहिरेपण किंवा कमी ऐकू येणे हा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर हृदयालाही याचा त्रास होतो. अतितणावामुळे धमन्या आकुंचन पावतात व उच्च रक्तदाबही निर्माण होतो. त्यामुळे कायमचा हृदयरोग माणसाला जडू शकतो. सततच्या वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्यांना डोकेदुखी, ताणतणाव, पुरेशी झोप न लागणे या समस्याही उद्‌भवतात. 
- डॉ. राजन कर्णिक. 

डोंबिवलीतील शांतता क्षेत्र 

  • शास्त्रीनगर हॉस्पिटल, डोंबिवली (प.) 
  • मंजुनाथ विद्यालय, डोंबिवली (प.) 
  • जोंधळे पॉलिटेक्‍निक आणि हायस्कूल, डोंबिवली (प.) 
  • व्ही. पी. रोड, पेंडसे नगर परिसर, डोंबिवली (पू.) 
  • नेहरु मैदान परिसर, डोंबिवली (पू.) 
  • चोळेगाव, गावदेवी व मारुती मंदिर परिसर, ठाकुर्ली (पू.) 
  • महापालिका शाळा क्रं. 40 व डॉ. राजेंद्र प्रसाद शाळा परिसर, ठाकुर्ली (पू.) 

ही शांतता क्षेत्र म्हणून घोषित केली असली तरी या क्षेत्रातही विहीत मर्यादेपेक्षा ध्वनी प्रदूषणाची पातळी जास्त आढळून आल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com