esakal | कल्याण फूलबाजार रंगीबेरंगी फुलांनी सजला 
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण फूलबाजार रंगीबेरंगी फुलांनी सजला 

रविवारी एका दिवसात तब्बल 50 टन फुलांची विक्री झाली आहे.

कल्याण फूलबाजार रंगीबेरंगी फुलांनी सजला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टिटवाळ : गणपती उत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू आहे. बाप्पा घरी येणार म्हणून मखर सजावटीसोबत, विद्युत रोषणाई करून बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या गणेशभक्तांनी बाप्पाच्या पूजेला लागणाऱ्या रंगीबेरंगी, सुवासिक फुलांच्या खरेदीसाठी रविवारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने हा बाजार फुलून गेला होता. 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फूलबाजार मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, मोहना, शहापूर, भिवंडी, कसारा, उल्हासनगर येथून नागरिक मोठ्या संख्येने फुले खरेदी करण्यासाठी येत असतात. गुलाब, शेवंती, मोगरा, लाल गोंडा, पिवळा गोंडा, लाल चेरडा, अष्टर, छोटा झेंडू, गुलछडी, गुलाब, जरबेरा, लिली आदी फुलांना मोठी मागणी असल्याने फूलबाजारामध्ये मोठी गर्दी उसळली होती. 

पूजेला लागणारी फुले, हार, बेलपत्र, दुर्वा, केवडा आणि तुळशीपत्र स्वस्त आणि ताजी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून कल्याण बाजार समितीच्या आवारातील फूलबाजाराची ओळख आहे. रविवारी एका दिवसात तब्बल 50 टन फुलांची विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. गणपतीला लागणाऱ्या लाल फुलांच्या हारांची किमत दोनशेहून अधिक होती; तर केवड्याची पात 40 ते 100 रुपयांपर्यंत विकल्या जात होत्या. पावसामुळे फुलांची आवक कमी झाल्याने या घाऊक मार्केटमध्येही फुलांची दरवाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर दिसत होता. 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फूलबाजार सध्या पडक्‍या शेडमध्ये सुरू आहे. सण-उत्सवाच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथे अद्ययावत मार्केट झाल्यास फुलांची निगराणी व्यवस्थित करता येईल. 
- भाऊ नरोडे, अध्यक्ष 
फूलबाजार मार्केट आवार 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फूलबाजार मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिक सण-उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यांना सोई-सुविधा देण्यासाठी बाजार समिती नियोजनबद्ध काम करीत आहे. पावसामुळे आवक कमी झाल्याने फुलांचे भाव चढे आहेत. 
- कपिल थळे, सभापती 
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती 

loading image
go to top