कल्याण-कसारा लोकल मार्गावर; महिला प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर  रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक

रविंद्र खरात
Saturday, 28 November 2020

मध्य रेल्वेच्या आटगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी (ता.25) रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास धावत्या लोकलमध्ये महिला डब्यात 21 वर्षीय तरुणीचा दोन जणांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली

कल्याण : मध्य रेल्वेच्या आटगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी (ता.25) रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास धावत्या लोकलमध्ये महिला डब्यात 21 वर्षीय तरुणीचा दोन जणांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली. या तरुणीला आरोपींनी लोकलमधून खाली फेकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या घटनेचा कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने निषेध केला असून, या मार्गावर लोकल प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहे. 

हेही वाचा - ठाणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदी डॉ. दांगडे; शुक्रवारी पदभार स्विकारला

कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर प्रवास करताना महिला डब्यात अथवा रेल्वे स्थानकामधील फलाटावर पोलीस, सुरक्षा रक्षक नसल्याच्या तक्रारी संघटनेकडून वारंवार केल्या जातात. मात्र त्यास केराची टोपली दाखविली जात असल्याने महिला प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच आता बुधवारी (ता.25) कल्याण-कसारा मार्गावर दोघा तरुणांनी एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने शेवटपर्यंत त्यास प्रतिकार केला. यावेळी झटापटीत तिला चालत्या लोकलमधून फेकून देण्याचाही प्रयत्न झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 
संघटनेतर्फे तत्कालिन आरपीएफ आयुक्त रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे लोहमार्ग पोलिस यांचीही भेट घेऊन महिलांची सुरक्षेबाबत समस्या मांडल्या. विद्यमान विधानपरिषद उपसभापती आमदार नीलम गोर्हे यांनाही भेटून निवेदन दिले. त्यांच्या पुढाकाराने तत्कालिन गृहराज्यमंञी दिपक केसरकर व रेल्वे पोलिस महासंचालक यांच्या बैठाकीतही महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर चर्चा केली. मात्र एखादा दुर्दैवी प्रसंग घडला कि महिला प्रवाशांच्या प्रवासाबाबत चर्चा होते व ती हवेत विरून जाते. अशा घटना वारंवार घडतात त्यावेळी संबधित लोकलमध्ये पोलिस का तैनात नव्हता? अथवा जर कागदोपञी असेल तर मग त्याच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी. अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला संघटक आशा डिसुझा यांनी केली आहे. 

हेही वाचा - ठाण्यातील रस्त्याचे रुंदीकरण कोणाच्या फायद्यासाठी? भाजप नगरसेवकांचा सवाल

आरोपींना पोलिस कोठडी 
आरोपी अमोल जाधव आणि अमन हिले यांच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्यांना आज न्यायालयामध्ये हजर केले असता आरोपी अमोल जाधव याला 3 डिसेंबर तर अमन हिले याला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेचे दखल घेत सायंकाळी सहानंतर लोकल बंद होईपर्यंत आणि पहाटे कल्याण ते कसारा लोकलमध्ये कल्याण रेल्वे पोलीस पेट्रोलिंग करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

 

संघटनेतर्फे वारंवार महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे लोहमार्ग यांच्याकडे पाठपुरावा करीत असतो. गेल्या पाच महिन्यांपासून नेहमीसारखा प्रवाशांचा ताण नसतानाही जर अशा घटना घडत असतील व यावर कोणतेही नियंञण राखता येत नसेल तर महिला प्रवाशांचे दुर्दैव आहे. 
- काजल पगारे,
महिला संघटक, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना. 

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the Kalyan Kasara local route Railway Passengers Association aggressive on safety of women passengers