कल्याण-मुरबाड रेल्वेच्या आशा पल्लवित

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे काम वेगाने होणार असून येत्या चार महिन्यांत अंतिम डीपीआर (रेल्वेमार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल) आल्यानंतर नऊ महिन्यांत कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली. त्यामुळे मुरबाड रेल्वेमार्गाचे काम वेगाने पूर्ण होईल, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. या रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारने ५० टक्के निधी देण्याचे जाहीर केले आहे. 

 

मुरबाड : कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे काम वेगाने होणार असून येत्या चार महिन्यांत अंतिम डीपीआर (रेल्वेमार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल) आल्यानंतर नऊ महिन्यांत कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली. त्यामुळे मुरबाड रेल्वेमार्गाचे काम वेगाने पूर्ण होईल, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. या रेल्वेमार्गाच्या कामासाठी राज्य सरकारने ५० टक्के निधी देण्याचे जाहीर केले आहे. 

रेल्वे प्रशासनातर्फे मुंबईत खासदारांची नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता, मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचे (एमआरव्हीसी) अध्यक्ष आर. एस. खुराना, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांचे प्रश्‍न खासदार कपिल पाटील यांनी मांडले. त्याचबरोबर कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा डीपीआर प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधले होते.

दरम्यान, पश्‍चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत वातानुकूलित लोकल सुरू करावी, अशी आग्रही मागणी खासदार कपिल पाटील यांनी या वेळी केली. 

खडवलीत अंडरपास 
टिटवाळा रेल्वेस्थानकात उड्डाण पूल मंजूर करण्यात आला आहे; तर खडवली येथील फाटकामध्ये रेल्वे भुयारी मार्गाच्या (अंडरपास) कामाला मंजुरी मिळाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. टिटवाळा येथील उड्डाण पुलाचे लवकरच भूमिपूजन करण्याचे आश्‍वासन खासदार पाटील यांनी दिले. बदलापूर स्थानकातील अपूर्ण रेल्वे शेडचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Kalyan-Murbad Railway springs up