नेवाळीप्रकरणी एकाही निरपराधावर कारवाई नाही : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

कल्याण - नेवाळीला मागील आठवड्यात झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांकडून एकाही निरपराध व्यक्तीवर कारवाई होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचप्रमाणे या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

कल्याण - नेवाळीला मागील आठवड्यात झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांकडून एकाही निरपराध व्यक्तीवर कारवाई होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचप्रमाणे या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विमानतळासाठी संपादित केलेल्या नेवाळी येथील जमीन हस्तांतरित प्रकरणासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कल्याण आणि परिसरातील भारतीय जनता पक्षाचे आमदार तसेच खासदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्याआधी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील व आमदार गणपत गायकवाड यांनी भाल व नेवाळी पाडा येथे शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार नरेंद्र पवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्यासह नेवाळी येथील शेतकऱ्यांचा समावेश होता.

मूळ शेतकऱ्यांना जमीन हस्तांतरित करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी नौदलाचे अधिकारी, राज्य सरकारचे उच्चस्तरीय महसूल अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. या समितीसमोर शेतकऱ्यांची सुनावणी घ्यावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. नेवाळीतील आंदोलनाप्रकरणात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून कारवाई सुुुरु करण्यात आली आहे. या कारवाईत निरपराध व्यक्तींना त्रास होऊ नये, अशी आग्रही मागणी खासदार कपिल पाटील व गणपत गायकवाड यांनी केली. त्यावेळी पोलिसांकडून एकाही निरपराध व्यक्तीला त्रास होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले. या प्रश्नासंदर्भात संरक्षणमंत्री अरुण जेटली, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याबरोबर बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यात निश्‍चितच तोडगा निघेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalyan news mumbai news nevali issue devendra fadnavis