कल्याण: रेल्वे प्रवाशांवरील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी

रविंद्र खरात
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी राजेश घनघाव, भरत खरे, श्याम उबाळे, शैलेश राऊत, विजय देशेकर, सचिन जाधव, अनिल ञिपाठी आदीच्या शिष्टमंडळाने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस.पिंगळे ,पोलिस निरीक्षक माणिक साठे आदीची भेट घेतली.

कल्याण : कल्याण ते कसारा आणि कल्याण कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे प्रवास करताना मोबाईल आणि मौल्यवान वस्तु चोरीचे प्रकार वाढले असून या वाढत्या गुन्हेगारीला आळा घाला अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनांनी कल्याणमधील रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी वर्गाची भेट घेवून केली.

कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी राजेश घनघाव, भरत खरे, श्याम उबाळे, शैलेश राऊत, विजय देशेकर, सचिन जाधव, अनिल ञिपाठी आदीच्या शिष्टमंडळाने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस.पिंगळे ,पोलिस निरीक्षक माणिक साठे आदीची भेट घेतली. यावेळी प्रवासी संघटनेने कल्याण ते कसारा व कल्याण ते बदलापुर या रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवासी बांधवांच्या दैनंदिन प्रवासातील सुरक्षिततेसंबधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

रेल्वे प्रवासात पिक अवरमध्ये डोअर ब्लाकर्स यांच्या वरील कारवाई अधिक कडक स्वरूपात करणे, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तु चोरीवर अधिक प्रखरतेने नियंञण ठेवून या चोरीवर प्रतिबंध करण्यासोबत यातील दोषी गुन्हेगारांना कड़क शिक्षा दया. राञीच्या वेळी लोकल गाड्यांमध्ये महिला डब्यांमध्ये पोलिस तैनात करा .रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या  प्रवाश्यावर दंडा त्मक कारवाई करा, अपंग डब्यातील घुसखोरीवर नियंञणासह भिकारी, गर्दुल्ले यांचा ताबडतोब बंदोबस्त करणे. त्यासोबत प्रवासी वर्गात प्रबोधन आणि शिस्त लावण्यासाठी प्रवासी संघटनेला सोबत घेवून उपक्रम राबवा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी रेल्वे पोलिस अधिकारी वर्गाने प्रवासी संघटना पदाधिकारी वर्गाच्या मागण्यावर लवकरच उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Kalyan news railway passengers demand to police