कल्याण पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे स्वप्न अधुरे!

कल्याण पंचायत समिती इमारत
कल्याण पंचायत समिती इमारत

टिटवाळा : कल्याण पंचायत समितीच्या जीर्ण झालेल्या इमारतीत कर्मचारी-अधिकारी जीव मुठीत घेऊन काम करतात. या इमारतीच्या जागी नवीन इमारत उभारणे अपेक्षित असताना या इमारतीच्या डागडुजीचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी ८५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे कल्याण तालुक्‍याचा कारभार धोकादायक इमारतीतच सुरू राहणार असून, नवीन इमारतीच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे.

कल्याण पंचायत समितीच्या लोंडबेअरिंग पद्धतीने ९९२ चौ.मी.च्या जागेत उभारलेल्या इमारतीचे उद्‌घाटन १९६२ ला झाले होते. या इमारतीला ५७ वर्षे पूर्ण झाली असून ती धोकादायक ठरली आहे. या इमारतीत कृषी पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, आरोग्य, बालविकास, शिक्षण, ग्रामपंचायत, ग्रामविकास, लेखाविभाग, सभागृह, बांधकाम सभापती, उपसभापती दालन, नरेगा, लघु पाटबंधारे आदी विभागांचे कामकाज चालत असून, सुमारे ८० ते १०० कर्मचारी येथे काम करतात.

शिवाय दररोज हजारो नागरिकांची ये-जा या कार्यालयात असते. पंचायत समिती इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. तरीही या इमारतीच्या दुरुस्तीचे नाटक का? असा सवाल नागरिक करीत आहेत. ही दुरुस्ती म्हणजे गैरव्यवहाराला साथ ठरेल, असा आरोप सरपंच संघटनेने केला आहे.

जिल्हा परिषदेची उदासीनता, अधिकाऱ्यांचे वेळकाढू धोरण आणि वाढीव चटईक्षेत्राचा घोळ याच्यातच कल्याण पंचायत समितीची इमारत आडकली आहे. येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात आर्थिक हितसंबंध गुंतल्याने तालुका पंचायत समितीचा कारभार वादग्रस्त ठरत आहे.

इमारतीची वाताहत    
कल्याण पंचायत समितीच्या इमारतीसाठी प्रथम वाढीव चटईक्षेत्राचा प्रश्न निर्माण झाला. याबाबतची फाईल पालिका आयुक्त, मंत्रालय अशी फिरत राहिली. यानंतर जागा भाड्याने घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. आमदार किसन कथोरे यांनी लक्ष घालत पंचायत समिती गोवेली येथे हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या. पण लोकप्रतिनिधी व कर्मचारीवर्गाने विरोध दर्शवला. हाही प्रयत्न निष्फळ ठरल्याने पंचायत समिती स्थलांतर होणार नसले तरी आहे तेथेच जीव मुठीत घेऊन काम करावे लागणार आहे.

पंचायत समिती इमारत धोकादायक स्थितीत आहेत. नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव वरिष्ठ विभागाकडे पाठवला आहे.
- श्वेता पालवे, गटविकास अधिकारी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com