कल्याण पत्रीपुलाच्या कामाला वेग, गुरुवारपर्यंत पुलावरील रात्रीची वाहतूक बंद

रविंद्र खरात
Tuesday, 20 October 2020

कल्याणमधील दोन वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला वेग आला आहे. चौथ्या टप्यात पत्रीपूल गर्डर ठेवण्याचे काम सोमवारपासून म्हणजेच 19 ऑक्टोबर ते गुरुवार  22 ऑक्टोबर रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत करण्यात येणार आहे.

मुंबईः कल्याणमधील दोन वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला वेग आला आहे. चौथ्या टप्यात पत्रीपूल गर्डर ठेवण्याचे काम सोमवारपासून म्हणजेच 19 ऑक्टोबर ते गुरुवार  22 ऑक्टोबर रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे पत्रीपुलावरील वाहतूक बंद करण्यात येईल. या आठवड्यात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाची टीम सुरू असलेल्या पत्रीपूल कामाची पाहणी करण्यासाठी येणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाचे काम अंतिम टप्यात आहे. चौथ्या टप्प्यातील नवीन पत्रीपुलाचे गर्डर ठेवण्याचे काम करण्यासाठी मोठी क्रेन बाजूच्या पुलावर ठेवून गर्डर ठेवण्याचे काम 19 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 या काळात काम करण्यात येणार असल्याने या परिसरमधील वाहतुकीत बदल केलेत.

अधिक वाचाः  आता सर्वांनाच लोकलनं प्रवास करण्याची परवानगी द्याः मुंबई उच्च न्यायालय

बदल असा

  • कल्याणमधून पत्री पूल मार्गे शिळफाट्याकडे जाणाऱ्या जड / अवजड वाहनांना राजनोली नाका येथे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून रांजनोली नाका भिवंडी येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वरून खारेगाव टोलनाका - मुंब्रा बायपास मार्गे पुढे जावे.

  • कल्याण शहरातून पत्री पूल मार्गे शिळफाटा कडे जाणाऱ्या मध्यम आणि हलक्या वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वाहनांनी दुर्गामाता चौकातून डाव्या बाजूने आधारवाडीचौक, खडकपाडा चौक भवानी चौक (प्रेम ऑटो सर्कल), नेताजी सुभाष चौकमधून पुढे इच्छित स्थळी जातील.

  • कल्याण- नगर महामार्गावरून पत्री पूलमार्गे शिळफाटा रोडकडे जाणाऱ्या वाहनांना कल्याणमधील सुभाष चौकात बंदी असेल. या मार्गावरील वाहनांनी सुभाष चौकात डाव्या बाजूने वालधुनी ब्रीज वरून इच्छित स्थळी जातील.
  • कल्याण शिळफाटा रोडवरील कल्याण पश्चिम आणि पूर्वेस जोडणारा जुना पत्री पुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहनांना कल्याण पूर्वेकडील सूचक नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील सर्व वाहने कल्याण शीळ रोडवरील कल्याण पूर्व सूचक नाका येथून उजवीकडे वळून पुढे जातील. कल्याण फाटाकडून कल्याण पश्चिमेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कल्याण फाटा – खारगाव टोल नाका येथे पुढे जावे. नवीन पत्रीपुलाचे काम अंतिम टप्यात असून त्याची पाहणी करण्यासाठी रेल्वेची वरिष्ठ अधिकारी वर्गाची टीम येणार आहे. त्यांनी हिरवा कंदील देताच चार तासाचे दोन पॉवर ब्लॉक रेल्वे कडून घेऊन पत्रीपुलाच्या अंतिम टप्यातील काम होईल. आता पत्रीपुलाच्या कामाला वेग आला असून काम कधी पूर्ण होते त्याकडे सर्वांचच लक्ष लागले आहे.

नवीन पत्रीपुल गर्डर ठेवण्याच्या कामासाठी

19 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर रात्री 10 ते पहाटे 5 या रात्रीचे वाहतूक मध्ये बदल केल्याने नागरिकांनी पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन कल्याण पूर्व कोळशेवाडी वाहतूक पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांनी केले आहे.

----------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Kalyan Patripul night traffic on the bridge closed till Thursday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyan Patripul night traffic on the bridge closed till Thursday