कमला मिल अग्नितांडव प्रकरणः गिरणी मालक सत्र न्यायालयाकडून दोषमुक्त जाहीर

सुनीता महामुणकर
Wednesday, 11 November 2020

तीन वर्षांपूर्वी कमला मिलमध्ये झालेल्या अग्नितांडवाच्या खटल्यातून गिरणी मालक रवी भंडारी आणि रमेश गोवानी यांना सत्र न्यायालयाने मंगळवारी दोषमुक्त जाहीर केले.

मुंबई: तीन वर्षांपूर्वी कमला मिलमध्ये झालेल्या अग्नितांडवाच्या खटल्यातून गिरणी मालक रवी भंडारी आणि रमेश गोवानी यांना सत्र न्यायालयाने मंगळवारी दोषमुक्त जाहीर केले. मात्र आगीस कारणीभूत ठरलेल्या वन अबोव्ह आणि मोजो बिस्त्रो या पबच्या मालकांवरील आरोप कायम ठेवले. त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा खटला या आरोपींसह मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर चालणार आहे.

पबला लागलेल्या आगीमध्ये चौदा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. पोलिसांनी या प्रकरणात गिरणी मालक, पबचे मालक, महापालिका अधिकारी आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या जळीतकांडशी आमचा काही संबंध नाही, अशी मागणी करणारा अर्ज गिरणी मालकांच्या वतीने करण्यात आला होता. मंगळवारी न्यायालयाने हा अर्ज मान्य केला.

वन अबोव्ह पबचे मालक क्रुपेश संघवी आणि जिगर संघवी आणि मोजो बिस्त्रोचे मालक युग तुली यांनीही दोषमुक्ततेसाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. सदोष मनुष्यवधासह कामात कसूर, नियमांचे उल्लंघन आदीक्ष आरोपांना अन्य आरोपींनीही न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज नामंजूर केला. अभियोग पक्षाने या सर्व अर्जांना विरोध केला होता.

अधिक वाचा-  अर्णब गोस्वामी यांना पोलिस कोठडी मिळणार? उद्या होणार फैसला

वन अबोव्ह पबचे व्यवस्थापक लिस्बन लोपेझ, केविन बावा, हॉटेल चालक विशाल कारिया, अग्निशमन अधिकारी राजेश पाटील, जी दक्षिण विभागाचे उप अभियंता दिनेश महाले, वरळीचे सहाय्यक अग्निशमन अधिकारी संदीप शिंदे  यांचा यामध्ये समावेश आहे.

अधिक वाचा तो शब्द पाळला गेला नाही म्हणून महाराष्ट्रात नवे राजकीय महाभारत घडलेः सामना

डिसेंबर 2017 मध्ये पबमध्ये हुक्का पुरवताना आगीचा भडका उडाला. यामध्ये चौदा जणांचा मृत्यू झाला. उच्च न्यायालयाने अग्निकांडच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली होती. आग प्रतिबंधक नियमांची पूर्तता न करणे, अवैधपणे अतिरिक्त जागा वापरणे, सुरक्षेचे नियम धुडकावणे यामध्ये आरोपींनी कसूर केल्याचा 206 पानी अहवाल समितीने दिला आहे.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Kamla Mill fire case Mill owner acquitted by Sessions Court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kamla Mill fire case Mill owner acquitted by Sessions Court