"कंगना कसली झाशीची राणी, ती तर पत्त्यांच्या कॅटमधली राणी" | Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash surve

"कंगना कसली झाशीची राणी, ती तर पत्त्यांच्या कॅटमधली राणी"

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्याबाबत (Indian freedom) अनुचित उद्गार काढणारी (controversial statement) अभिनेत्री कंगना रणावत (kangana Ranaut) हिच्याविरोधात शिवसेनेनेही (shivsena) आक्रमक भूमिका घेतली आहे. रणावत हिचे डोके फिरले असून ती झाशीची राणी नाही तर पत्त्यांच्या कॅटमधील कागदी राणी आहे, असा आरोप मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी केला. तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार (Padmashree Award) केंद्राने परत घ्यावा या मागणीसाठी त्यांनी आज स्वाक्षरी मोहीम (signature campaign) सुरु केली.

हेही वाचा: माणुसकी जपणाऱ्या माणसाचं गोंदण: ऑल इज वेल

देशाला 1947 मध्ये मिळालेले स्वतंत्र ही भीक होती, देशाला तर खरे स्वातंत्र 2014 मध्ये मिळाले, असे उद्गार कंगना ने काढल्याने मोठाच गदारोळ झाला आहे. तिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काँग्रेसचे नसीम खान यांनी साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानंतर आता शिवसेनेनेही तिच्याविरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. आमदार व शिवसेनेचे उत्तर मुंबई विभागप्रमुख विलास पोतनीस तसेच मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे यांच्या पुढाकारने आज सकाळी बोरिवली (पूर्व) रेल्वे स्थानकाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले.

तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा या मागणीसाठी केंद्राला द्यावयाच्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आला. या स्वाक्षऱ्या करण्यासाठी तेथे नागरिकांनी मोठीच गर्दी केली होती. देशाच्या स्वातंत्र्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगनाचे डोके फिरले आहे. तिच्या या अपमानास्पद वक्तव्याने संपूर्ण देशाचा आणि देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान झालेला आहे, असा आरोप आमदार प्रकाश सुर्वे यांनी यावेळी केला.

त्यामुळे राष्ट्रपतींनी कंगना रणावतचा पद्मश्री किताब परत घ्यावा तसेच तिच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिला त्वरित अटक करावी अशा मागण्या आम्ही करीत आहोत. या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांची स्वाक्षरी मोहीमही हाती घेतली आहे. चित्रपटात झाशीच्या राणीची भूमिका केलेली कंगना ही प्रत्यक्षात पत्त्यांच्या कॅटमधली कठपुतली राणी निघाली, असेही सुर्वे म्हणाले. यावेळी कंगनाविरोधात घोषणाबाजी तसेच तीव्र आंदोलन करण्यात आले.

loading image
go to top