महापौरपदासाठी पुन्हा कविता चौतमोल

महापौरपदासाठी पुन्हा कविता चौतमोल

पनवेल : महापौरपदाकरिता पुन्हा डॉ. कविता चौतमोल यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजपमधील वेगवान घडामोडींमुळे जिल्ह्याचे लक्ष या पदासाठीच्या घोषणेकडे लागले होते. भाजपमधील सुमारे २० महिला इच्छुक होत्या. त्यामुळे वाद टाळण्यासाठी चौतमल यांचे नाव पुन्हा पुढे आले आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाने महापौरपदासाठी प्रिया भोईर आणि उपमहापौर पदासाठी डॉ. सुरेखा मोहकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता मावळली आहे.

महापौरपदावर वर्णी लागावी याकरिता पनवेलमध्ये चढाओढ सुरू होती. अखेर मंगळवारी (ता.७) हे नाट्य वेगळ्या वळणावर आले.   तर उपमहापौर पदाकरिता अपेक्षेप्रमाणे जगदीश गायकवाड यांना संधी देण्यात आली.  महापौरपदाकरिता अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत  इच्छुक उमेदवारांमध्ये नाट्य  सुरू होते; मात्र पक्षश्रेष्ठींनी चौतमोल यांनाच संधी दिल्याने नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले.

७८ सदस्य असलेल्या पनवेल महापालिकेत भारतीय जनता पार्टीचे ५१ सदस्य निवडून आले असल्याने सभागृहात भाजपकडे निर्विवाद बहुमत आहे. प्रथम महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने या पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यामध्ये खुल्या महिला प्रवर्गातील नगरसेविकेसाठी महापौरपद आरक्षित झाल्याने महापौर शर्यतीत एकाच वेळी अनेक महिला सदस्या उतरल्या होत्या. दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाने महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महापौरपद मिळावे याकरिता पालिका हद्दीतील भाजप नगरसेविकानी मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी केली होती. यामध्ये सुरुवातील नवीन पनवेल येथील नगरसेविका ॲड. वृषाली वाघमारे, दर्शना भोईर, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती लीना गरड, नगरसेविका संजना कदम यांची नावे प्रामुख्याने पुढे आली होती; मात्र डॉ. कविता चौतमोल यांनी अर्ज दाखल केल्‍याने इच्छूक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली. 

खारघरच्या पदरी निराशा
खारघर, ता. ७ (बातमीदार) : खारघरला महापौरपद मिळावे म्हणून खुल्या गटातून निवडून आलेल्या तीनही नगरसेविकांच्या पदरी निराशा पडली. डॉ. कविता चौतमल यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद हे खुल्या गटातील महिला नगरसेवकांसाठी राखीव झाले होते.भाजपकडून खुल्या वर्गातील पाच नगरसेविका निवडून आल्या होत्या. त्यात खारघरमधून लीना गरड, नेत्रा पाटील आणि संजना कदम या होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लीना गरड  यांना महापौरपदाची संधी दिल्यास भविष्यात त्या विधानसभा निवडणुकीसाठी दावा करू शकतील, असे भाजप श्रेष्ठीच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे खारघरमधील काही नगरसेवकांनीच त्यांच्या नावाला विरोध दर्शविला.  

जातीय समीकरण राबवण्यात पक्षश्रेष्ठी अनुत्सुक 
महापौरपद सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झाले होते. त्यामुळे सर्वसाधारण समाजातील नगरसेविकेची नेमणूक करून सामाजिक समतोल राखणे पक्षश्रेष्ठींना शक्‍य असतानाही महापौर आणि उपमहापौर एकाच समाजाचा दिल्याने इतर समाजाची नाराजी पक्षश्रेष्ठींनी ओढवून घेतल्याची चर्चा अर्ज दाखल करताना दिसून आली. याबाबत सत्ताधारी नगरसेवकांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे भविष्यात याचा फटका भाजपला बसण्याची शक्‍यता आहे.  एकाच वेळी अनेकांनी महापौरपदाकरिता इच्छुकता दर्शवल्याने सोमवारी मार्केट यार्ड परिसरातील कार्यालयात भाजप नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तब्बल २० नगरसेविकांनी महापौरपदाकरिता इच्छुकता दर्शवल्याने इच्छुकांची यादी वरिष्ठांकडे पाठवून निर्णय घेण्यात येईल, असे संकेत देण्यात आले. तसेच याबाबतचा निर्णय मंगळवारी (ता.७) सकाळी देण्यात येईल, असे सांगण्यात आले. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत उरणचे आमदार महेश बादली व ४० नगरसेवक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com