भाजपाचे चार नगरसेवक फोडले, कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेकडून धक्का |KDMC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपाचे चार नगरसेवक फोडले, कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेकडून धक्का

भाजपाचे चार नगरसेवक फोडले, कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेकडून धक्का

डोंबिवली: केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर कल्याण डोंबिवलीत महापालिकेच्या 2015 च्या निवडणुकीत (Kdmc Election) भाजपाने इतर पक्षांचे नगरसेवक फोडून त्यांचा भाजपात (Bjp) प्रवेश करून आपले पक्षीय बलाबल वाढविले होते. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आल्याने (Mva govt) राजकीय गणिते बदलली आहेत. त्यातच यंदा प्रथमच पालिकेच्या (Corporation) पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असल्याने पक्षाची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेने आता सर्व पक्षांना लक्ष्य करीत फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. मनसे नंतर आता भाजपाला धक्का देत भाजपाचे चार नगरसेवक सेनेने फोडले आहेत. याबरोबरच येत्या काही दिवसांत काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतस शिवसेनेत इनकमिंगला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात मनसेला भगदाड पाडत शिवसेनेनं मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना गळाला लावले. आता भाजपच्या कमळाला लक्ष्य करीत सेनेने चार विद्यमान नगरसेवकांना आपल्याकडे खेचले आहे. डोंबिवलीतील भाजपाचे नगरसेवक महेश पाटील, नगरसेविका डॉ. सुनीता पाटील व सायली विचारे, विशाल पावशे हे चार नगरसेवक सोमवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सायंकाळी मुंबई येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

हेही वाचा: देशमुख आणि सिंह यांच्यातील वादावर 'SC' ने व्यक्त केली चिंता

भाजपाचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची गेले अनेक महिने चर्चा सुरू होती. मात्र कोरोना महामारीमुळे त्यांचा पक्ष प्रवेश लांबला होता. मात्र त्यांचा पक्ष प्रवेश आता निश्चित झाला आहे. मागील निवडणुकीत महेश पाटील व त्यांची बहीण डॉ. सुनीता पाटील तसेच सायली विचारे हे गोग्रासवाडी सांगावं या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे भाजपाची डोंबिवलीत ताकद वाढली होती. महेश पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात देखील आपल्या कार्याचा दबदबा निर्माण करून अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचे सरपंच निवडून आणण्याची किमया केली होती.

हेही वाचा: 'मोदींनी शेतकऱ्यांबद्दल गोड भाषा केली, आम्हाला संशय येतोय'

केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर 2015 च्या पालिका निवडणूकीत भाजपाने इतर पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक फोडून पक्षाचे बलाबल वाढविले होते. भाकपाच्या लाटेत अनेक नगरसेवक निवडून देखील आले. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. पॅनल पद्धतीने पालिका निवडणुका होणार असल्याने सेनेचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक नगरसेवक सेनेच्या वाटेवर आहेत. मनसे, भाजपानंतर काँग्रेसचे दिग्गज नगरसेवक सेनेत प्रवेश करणार आहेत. तसेच 2015 ला राष्ट्रवादीतून भाजपामध्ये गेलेले काही नगरसेवक देखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे इनकमिंग जोरात सुरू असून येत्या निवडणुकीत त्याचा पक्षाला किती फायदा होतो व विरोधी पक्षाला किती फटका बसतो हे पहावे लागेल.

कल्याण डोंबिवली पक्षीय बलाबल

कल्याण डोंबिवली महापालिकेत 122 जागा आहेत. त्यापैकी शिवसेनेकडे 52 जागा, भाजपाकडे 42, काँग्रेसकडे 4, राष्ट्रवादी 2, मनसे 9 व एमआयएमकडे 1 आणि अपक्षांकडे 10 जागा आहेत. पालिकेत 122 जागांमध्ये वाढ होऊन संख्या 133 होणार आहे. यामुळे पक्षीय बलाबल कसे होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top