माणूसकीची भिंत कोलमडली; 'KDMC'च्या उपक्रमाकडे खुद्द पालिकेचेच दुर्लक्ष | kdmc news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kdmc

माणूसकीची भिंत कोलमडली; 'KDMC'च्या उपक्रमाकडे खुद्द पालिकेचेच दुर्लक्ष

डोंबिवली : शहरातील गरीब व गरजू नागरिकांना त्यांच्या संसाराला उपयोगी साहित्य मिळावे यासाठी महापालिकेने (kdmc) साधारण वर्षभरापूर्वी कल्याण डोंबिवलीत माणूसकीची भिंत हा उपक्रम सुरु केला होता. मात्र सध्या ही माणूसकीची भिंत (Manuskichi bhint) कोलमडलेली दिसते. मागीलवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी ठेवण्यात येणारे साहित्य भिजत असल्याची बाब दै. सकाळने (sakal) उघडकीस आणली होती. त्यानंतर पावसाळा (Monsoon) असल्याने हा उपक्रम बंद ठेवण्यात आला होता. मार्च महिन्यात प्रभाग अधिकाऱ्यांची बदली होताच पुन्हा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मात्र दोन दिवसातच ही भिंत कोलमडल्याचे (wall collapse) दिसून येत आहे. पालिका प्रशासनानेच सुरु केलेल्या उपक्रमाकडे खुद्द पालिकेचेच दुर्लक्ष होत असून पालिकेच्याच आवारात असलेल्या या भिंतीचा बॅनर दोन दिवस निघाला असून त्याकडे कोणाचेच लक्ष जाऊ नये ही आश्चर्याची बाब आहे.

हेही वाचा: 6 वर्षाच्या ग्रीहिताने झिप्लायनिंग करत केला नवरा नवरी सुळखा पार

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार महापालिका आणि सामाजिक संस्था यांच्यावतीने माणुसकीची भिंत हा उपक्रम मागील वर्षी जानेवारी महिन्यात सुरु करण्यात आला. घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे व उपअभियंता मिलिंद गायकवाड यांच्या प्रयत्नांतून तो साकारण्यात आला. डोंबिवलीत महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालय, टंडन रोड अशा दोन ठिकाणी ही माणूसकीची भिंत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. नागरिक या ठिकाणी त्यांना नको असलेले सुस्थितीतील कपडे, गरजेच्या वस्तू ठेवतात, जेणेकरून गरजू नागरिक त्याचा वापर करू शकतील. सुरुवातीला नागरिकांनी या उपक्रमास चांगला प्रतिसाद देखील दिला.

नंतर मात्र या उपक्रमाला घरघर लागल्याचे दिसते. नागरिक घरातील अडगळीत वस्तू या ठिकाणी आणून टाकत होते. गरजू व्यक्तीही या ठिकाणी वस्तू घेऊन जाण्यासाठी येत नसल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. पावसाळ्यात या वस्तू तशाच तेथे भिजत पडल्याचे दै. सकाळने वृत्त प्रसारित करत प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाला जाग येऊन त्यांनी तेथून त्या भिजलेल्या वस्तू हटवून माणूसकीची भिंत देखील हटविली होती. वस्तू भिजू नये म्हणून शेड उभारण्यात येईल असे आश्वासन पालिका प्रशासनाने त्यावेळी दिले होते. मात्र माणूसकीची भिंतच गायब झाल्याने शेडची आठवण देखील कोणाला झाली नाही.

हेही वाचा: 'पैसे सकाळी येतात, संध्याकाळी जातात', वीज तुटवड्यावर नितीन राऊतांचं स्पष्टीकरण

यावर्षी मार्च महिन्यात पालिका आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ग व फ प्रभागाची जबाबदारी प्रभारी सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी जबाबदारी हाती घेताच माणूसकीची भिंत हा उपक्रम पुन्हा सुरु केला. या ठिकाणी एक बॅनर लावून केवळ उपक्रमाची सुरुवात झाली. मात्र गेल्या दोन तीन दिवसांत येथे एकही साहित्य आले नाही की पालिका प्रशासनाचेही त्याकडे लक्ष नाही.

या बॅनरने देखील सध्या मान टाकली असून ही भिंतच कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. टंडन रोडवर उभारण्यात आलेल्या माणूसकीच्या भिंतीचे देखील असेच हाल आहेत. या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी कचरा टाकला जात असल्याने या ठिकाणी अस्वच्छता आणि घाणीचेच साम्राज्य जास्त दिसते. पालिका प्रशासनाला स्वतः हाती घेतलेल्या उपक्रमांचीच जबाबदारी नीट सांभाळता येत नसल्याची चर्चा यामुळे शहरात होत आहे.

Web Title: Kdmc Itself Ignores Kdmc Manuskichi Bhint Campaign As Banner On Wall Disappear Kdmc News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :dombivalikalyan
go to top