नॉन कोविड रुग्णांसाठी 'केईएम' ठरतंय वरदान! गंभीर रुग्णांवर होताहेत उपचार

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा 
Friday, 17 July 2020

केईएम रुग्णालयाच्या ओपीडीत रोज किमान 10 ते 12 रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यावर आपत्कालीन आणि गंभीर रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

मुंबई : सध्या जवळपास प्रत्येक रुग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. अशात गंभीर नाॅन कोव्हिड रुग्णांवर उपचार कुठे करायचे? हा प्रश्न असताना पालिकेच्या केईएम रुग्णालयात मात्र कोणत्याही गंभीर रुग्णाला परत पाठवले जात नाही. आता ओपीडीत रोज किमान 10 ते 12 रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यावर आपत्कालीन आणि गंभीर रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. तसेच, लाॅकडाऊन काळात नाॅन कोव्हिड गंभीर रुग्णांवर 66 यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचे केईएम रुग्णालयाच्या न्यूरोसर्जन विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक डाॅ. अतुल गोयल यांनी सांगितले. 

वाचा - मालवणी इमारत दुर्घटना: मृतांच्या कुटुंबियांना सरकारचा मदतीचा हात

केईएम रुग्णालयातील न्युरोलाॅजी विभागातील डाॅक्टरांनी सर्व वयोगटातील नाॅन कोव्हिड गंभीर रुग्णांवर गेल्या चार महिन्यांत एकूण 66 शस्त्रक्रिया केल्या आहेत. दररोज किमान 2 शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. सर्व वयोगटातील म्हणजेच काही दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळापासून ते 70 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांवर गंभीर शस्त्रक्रिया करुन त्यांचा जीव वाचवण्यात डाॅक्टरांना यश आले आहे. यात जवळपास 8 ते 9 बाळांचा समावेश आहे. बाकी सर्व 14 ते 70 वयोगटातील असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. यात ब्रेन ट्युमर, डोक्याला लागलेला मार, कर्करोग, पक्षाघात, स्पाईनच्या समस्या, स्पाॅन्डेलिसीस, मेंदूत रक्ताच्या गुठळ्या, ब्रेन हेमरेज अशा महत्वाच्या आणि गंभीर शस्त्रक्रियांचा समावेश आहे. जन्मतःच मेंदूत रक्तस्राव होणे, कंबरेला गाठ येणे अशा गंभीर स्वरूपाच्या किमान 8 ते 9 शस्त्रक्रिया केल्याचे डाॅ. अतुल गोयल यांनी सांगितले आहे.

वाचा - लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर कर्ज घेण्याची वेळ; पण कशासाठी? वाचून तुम्हालाही धक्का बसेल...

नाॅन कोव्हिड रुग्णांसाठी वाॅर्डची गरज
केईएम रुग्णालयातील अनेक वाॅर्ड हे सध्या कोव्हिडसाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे  नाॅन कोव्हिड रुग्णांवर उपचार कुठे करायचे, हा प्रश्न निर्माण होत आहे. आता हळूहळू सर्जरीचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे जे रूग्ण बरे झाले आहेत त्यांना डिस्चार्ज करुन आता नाॅन कोव्हिड रुग्णांसाठी वाॅर्डची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत डाॅ अतुल गोयल यांनी व्यक्त केले. 

 

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे नाॅनकोव्हिड रुग्णांची संख्या खूपच कमी झाली होती. आता ही संख्या हळूहळू वाढत आहे. 13 जणांची टिम गेल्या 4 महिन्यांपासून रुग्णांना सेवा देण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. संपूर्णपणे मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. खासगी रुग्णालयात याच शस्त्रक्रियांसाठी 5 ते 6 लाख रुपये मोजावे लागतात. सामान्य रुग्णांना ते परवडणारे नसतात.
 - डाॅ. अतुल गोयल, प्रमुख आणि प्राध्यापक, न्यूरोसर्जन विभाग, केईएम रुग्णालय 

 

कोव्हिडसोबत इतर आजारांवरच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. फक्त गंभीर आणि आपत्कालीन परिस्थितीत असणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रिया आतापर्यंत केल्या गेल्या आहेत. त्यात लहान मुलांचाही समावेश असून अगदी 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींवर शस्त्रक्रिया करुन त्यांना जीवदान दिले गेले आहे. 
- डाॅ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'KEM' is a boon for non-covid patients! Severe patients are being treated

टॉपिकस