खंडाळाघाट आडोशी उतार बनले अपघातांचे केंद्र, महिन्यात सरासरी 5 मोठे अपघात

अनिल पाटील
Monday, 11 January 2021

आडोशी हा तीव्र उताराचा रस्ता आहे. अपघातांच्या घटनांमुळे एक्स्प्रेस वे वरील एकंदरीत अपघातांच्या घटनांचा आलेख वाढत आहे.

मुंबई:  मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोली हद्दीतील घाट अंतरात खालापूर टोल नाका मागच्या 4 किमी अंतरपासून एक्स्प्रेस वे किमी 36 ते  38 या दरम्यान आडोशी हा तीव्र उताराचा रस्ता आहे. या अंतरात लागोपाठ अपघातांच्या घटनांमुळे एक्स्प्रेस वे वरील एकंदरीत अपघातांच्या घटनांचा आलेख वाढत आहे. या अंतरात दर महिन्यात सरासरी 5 मोठे आणि अनेक किरकोळ अपघात घडत आहेत. गेल्या आठवड्यातील दोन अपघाताच्या घटना ताज्या असताना रविवारी पहाटे पुन्हा प्रवासी बसचा अपघात घडून 10 प्रवासी जखमी झाले. सतत होणारे अपघात आणि आपत्कालीन स्थितीमुळे आडोशी उतार अपघातांचे केंद्र बनले आहे.

येथील अपघातांचे मुख्य कारण तीव्र उतार, अतिवेगाने अनियंत्रित वाहने चालविणे हे असल्याचे विविध अपघातांच्या घटनांनी स्पष्ट झाले आहे. तसेच अनेक वेळा ब्रेक निकामी होऊन वाहने अनियंत्रित होऊन अपघात घडत आहेत. या संदर्भात आयआरबीच्या सर्व यंत्रणा, खोपोली पोलिस, महामार्ग वाहतूक पोलिसांकडून विविध मार्गाने प्रयत्न केले जात असूनही अपघातांच्या घटना मात्र वाढत्या आहेत. 

एक्सप्रेस वे वाहतूक पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुदाम पाचोरकर आणि त्यांची संपूर्ण टीम एक्स्प्रेस वे वरील विशेषतः  घाट आणि आडोशी टप्प्यात वेग आणि अनियंत्रित वाहने चालविण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी सतत जनजागृती ही केली जात आहे. मात्र लेनची शिस्त न पाळणे, अनियंत्रित आणि नियमबाह्य वाहने चालविणे सुरूच असल्याने अपघात घडत आहेत. त्यातून दरदिवशी वाहतूक कोंडी, मोठया संख्येने प्रवासी जखमी आणि मृत्यू  होऊन येथे सतत आपत्कालीन स्थिती निर्माण होत आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली- खालापूर हद्दीतच गेल्या 8 वर्षात अपघातांनी  हजाराचा टप्पा पार केला असून 350च्या आसपास प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. अवजड वाहने, हलकी वाहने आणि ओव्हरटेक करण्यासाठी लेन अशी रचना असताना वाहनचालक नियमाला हरताळ फासत आहेत.

आठ वर्षातील अपघात आकडेवारी

2013 एकूण अपघात- 198 (मृत्यू-49) (जखमी 91) 
2014 एकूण अपघात- 211(मृत्यू 53) (जखमी 96)
2015 एकूण अपघात-203 ( मृत्यू 63) (जखमी 45) 
2016 एकूण अपघात- 131 (मृत्यू 38) ( जखमी 70)
2017 एकूण अपघात- 168 (मृत्यू 43) ( जखमी 97) 
2018 एकूण अपघात -192 (मृत्यू 36) (जखमी 78)  
2019 एकूण अपघात- 161 (मृत्यू 29) (जखमी-54)
2020 एकूण अपघात- 142 (मृत्यू 14) (गंभीर जखमी 30), (किरकोळ जखमी 59)

आडोशी कार्नर अपघाताचे ठिकाण होण्याला वाहनचालकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरत आहे. घाट उतरताना न्यूट्रल आणि टॉप गिअर धोकादायक ठरतो. स्पेशल गिअरमध्ये वाहन चालविणे आवश्यक आहे. वेग मर्यादेचे पालन देखील होत नाही. महामार्ग पोलिसांकडून सातत्याने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जाते. याशिवाय वाहनचालकांमध्ये जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. वाहनचालकानी स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे.
जगदिश परदेशी, सहाय्यक पोलिस निरिक्षक बोरघाट महामार्ग

हेही वाचा- महिलांसाठी चांगली बातमी, ठाण्यात पालिकेनं उभारली 'पिरियड रुम'

वाहनांची तांत्रिक तपासणी आणि वाहतूक नियमांचे कठोर पालन झाल्यास अपघातांचा आलेख कमी होईल. संबंधित यंत्रणा आणि अधिकारी यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहेत.
सुदाम पाचोरकर, अधीक्षक एक्स्प्रेस वे वाहतूक पोलिस 

खंडाळा कडून मुंबई लेनवर अधिक अपघात होत आहेत. तीव्र उतार असूनही अनियंत्रित वाहने चालविणे, वाहनांचे ब्रेक निकामी होण्यानेही अपघात घडत आहेत. एक्स्प्रेसवरील वाहनांची तांत्रिक स्थिती उत्तम असणे आणि वाहन चालक पूर्ण प्रशिक्षित आणि वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी तपासणी मोहिम अधिक कडक राबविण्याची गरज  आहे.
गुरुनाथ साठेलकर, देवदूत आणि अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठीसक्रिय ग्रुपचे सदस्य

----------------

(संपादन- पूजा विचारे)

Khandala ghat center accidents average of 5 major accidents per month


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khandala ghat center accidents average of 5 major accidents per month