
Crime News : बीएमसी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकास लुटणाऱ्या आरोपीला खार पोलिसांकडून अटक
मुंबई : मुंबईच्या खार पोलिसांनी नुकतीच 37 वर्षीय अली झहुर जाफरी या तोतया बीएमसी कर्मचाऱ्याला ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा येथून अटक केली. अली झहुर या आरोपीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह 19पेक्षा अधिक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पश्चिमेकडील किरण सोसायटी जवळून जाणाऱ्या पन्नास वर्षे व्यक्तीला थांबवून बीएमसी अधिकारी असल्याचे भासवून पुढे नाकाबंदी चालू असून तुमच्या जवळचे दागिने काढून ठेवा असे सांगितले.
सद्या चोरीचे प्रमाण वाढले असून तुमचे सोने पिशवीत काढून ठेवा असे सांगून फिर्यादी यांच्या जवळील सोन्याची चेन व दोन अंगठ्या असा ऐवज एका पेपर मध्ये गुंडाळून तो पेपर फिर्यादी यांच्या बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले.
बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून फिर्यादी यांनी तक्रारी दिली यावरून खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला.
सर्वप्रथम सीसीटिव्ही फुटेज तपासले. यामध्ये आरोपीने खार ते बांद्रा, बांद्रा ते कुर्ला, कुर्ला ते ऐरोली हायवे असे 4 ते 5 वेळा रिक्षा बदलली असल्याची दिसून आले.
जवळजवळ 40 ठिकाणचे सीसीटिव्ही फूटेज पाहून तसेच गुप्त माहितीदार यांचे मदतीने अज्ञात आरोपी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा येथे राहत असल्याचे समजताच मुंब्रा पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्याला ताब्यात घेतले.
आरोपीने धाप लागल्याचा बनाव करून बेशुद्ध झालेचे नाटक करून जमिनीवर अंग टाकून दिले. पोलिसांनी शिताफीने त्यास गाडीत टाकून त्याची वैद्यकीय तपासणी करून खार पोलीस स्टेशन आणण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आले आहे.