डोंबिवली - नेहमी शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाले काकानेच बांधकाम व्यावसायिकाच्या 7 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची घटना घडली. अपहरण कर्त्यांनी मुलाच्या वडिलांकडे दोन कोटींची खंडणी मागितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना याची माहिती मिळताच मानपाडा व इतर पोलीस ठाण्याची 5 पथक तैनात करत मुलाचा शोध सुरू केला.
अवघ्या साडे तीन तासात शहापूर येथून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. रिक्षावर चालकाचा भाऊ आल्याने पोलिसांचा संशय बळावला, तपासाची चक्र त्या दिशेने फिरवत पोलिसांनी चौघांना अटक केली.
यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश असून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. रिक्षा चालक वीरेन पाटील (वय 25) आणि त्याच्या साथीदारासह अन्य दोन अल्पवयीन आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिजन्सी अनंतम येथे राहणारे महेश व कोमल भोईर यांचा 7 वर्षीय मुलगा कैवल्य शुक्रवारी सकाळी 28 मार्च रोजी अपहरण करण्यात आले.
फिर्यादी कोमल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा सकाळी 7.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास रिक्षा क्र. एमएच 07 डीक्यू 9888 मधून शाळेला जात असताना खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. सकाळी 9.30 वाजता अपहरण कर्त्यांनी मुलाच्या वडिलांना फोन करून 2 कोटींची खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास तसेच पोलीसांना कळविल्यास मुलास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
पोलीसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखुन लागलीच मानपाडा पोलीस ठाणे येथे अपहरण आणि खंडणीचा गुन्हा नोंद केला. सदर गुन्ह्याची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांची 5 वेगवेगळी तपास पथके तयार करुन त्यांना अपहृत मुलाचा शोध घेणे करीता आजुबाजुच्या परीसरात रवाना करण्यात आलेले होते.
तपासामध्ये फिर्यादी महीला कोमल भोईर यांचे तक्रारीवरुन मानपाडा पोलीसांनी बारकाईने तपास करत सकाळी अपहृत मुलास शाळेत घेवून जाणारा रिक्षाचालक विरेन पाटील याचा पोलीसांना संशय आला. विरें याचा भाऊ नंतरच्या फेरीला रिक्षावर आला होता.
त्याअनुषंगाने पोलीसांनी विरेन याच्या भावाला ताब्यात घेत चौकशी केली. तसेच तांत्रीक माहिती प्राप्त केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीचे तांत्रीक विश्लेषण करुन विरेन पाटील आणि रिक्षाचा माग काढुन अवघ्या साडेतीन तासात अपहृत मुलाची शहापुर येथुन शहापूर पोलिसांच्या मदतीने सुखरूप सुटका केलेली आहे.
अपहृत मुलास त्यांचे आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदर गुन्हयात चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असुन इतर आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. यात दोन अल्पवयीन आरोपी आहेत. त्यांच्यावर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत.
पैशांसाठी त्यांनी हे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती असून संपूर्ण अंगाने तपास सुरू आहे. यामागे अजून काही कारण आहेत का याचा ही शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त झेंडे यांनी दिली.
कल्याण परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादंबाने पोलीस निरीक्षक गुन्हे रामचंद्र चोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळे, महेश राळेभात कलगोंडा पाटील, हेमंत ढोले, स्वाती जगताप आणि त्यांच्या पथकाने मुलाची सुटका करण्यात विशेष कामगिरी बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.