esakal | उल्हासनगरात किरकोळ कारणावरून मित्राची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात किरकोळ कारणावरून मित्राची हत्या

आशीषने लोखंडी पत्रा दिनेशच्या डोक्‍यात मारला. सागर ठाकूर याने लाकडी दांडक्‍याने दिनेशच्या डोक्‍यावर हल्ला केल्याने दिनेश जागीच कोसळला.

उल्हासनगरात किरकोळ कारणावरून मित्राची हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात दोन मित्रांनी त्यांच्या मित्राची निघृण हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उल्हासनरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी काही तासातच भिवंडीमधील लॉजमध्ये लपून बसलेल्या दोघांवर झडप घातली असून त्यात एका तडीपाराचा समावेश आहे. 
हत्या झालेल्या तरुणाचे नाव दिनेश साधुराम शर्मा (30) असून तो कॅम्प क्र. 5 येथील प्रेमनगर टेकडी परिसरात राहत होता.

शर्मा कुटुंबीयांचा जिन्सचा कारखाना असून शनिवारी कारखान्यात सुट्टी असल्याने दिनेश घरी होता. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दिनेशला त्याचा मित्र आशीष करीरा याचा फोन आला. त्याने त्याला बियरची बाटली घेऊन कॅम्प नं. 4 येथील कॅनरा बॅंकेच्या पाठीमागे येण्यास सांगितले होते. दिनेश हा त्या ठिकाणी गेला असता तिथे त्याचे मित्र आशीष व सागर ठाकूर हे उभे होते.

त्यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान भांडणात होऊन आशीषने लोखंडी पत्रा दिनेशच्या डोक्‍यात मारला. सागर ठाकूर याने लाकडी दांडक्‍याने दिनेशच्या डोक्‍यावर हल्ला केल्याने दिनेश जागीच कोसळला. सागर व आशीष यांनी त्या ठिकाणाहून पळ काढल्यावर विठ्ठलवाडी पोलिसांनी धाव घेऊन जखमी दिनेशला उपचारासाठी मध्यवर्ती रूग्णालयात नेले; मात्र डॉक्‍टरांनी त्याला मयत घोषित केले. 
या घटनेप्रकरणी मनोज शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आशीष करीरा व सागर ठाकूर या दोघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

फरार आशीष व सागर हे दोघेही भिवंडी येथील एका लॉजमध्ये लपून बसले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिसांनी भिवंडी येथून आशीष व सागर या दोघांनाही अटक केली. 

त्यांनी दिनेश याची हत्या का केली? याची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून सहायक पोलिस निरीक्षक माने तपास करीत आहेत. या गुन्ह्यातील आशीष करीरा याच्यावर हिललाईन पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली होती. त्या हद्दपारीचे उल्लंघन करून तो पुन्हा शहरात मित्रांना भेटण्यासाठी आला होता. त्यातच त्याने आपला मित्र दिनेश याची हत्या केल्याचे तपासात पोलिसांना समजले आहे. 

loading image
go to top