ठाण्यात कुत्र्याला ठार करून जाळले; कृत्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संताप 

राहुल क्षीरसागर
Saturday, 21 November 2020

पशूंनाही लाजवेल असे अमानवीय कृत्य ठाण्यातील घोडबंदर रोडवर घडल्याने प्राणिमित्रांमध्ये रोष निर्माण झाला आहे

ठाणे  ः पशूंनाही लाजवेल असे अमानवीय कृत्य ठाण्यातील घोडबंदर रोडवर घडल्याने प्राणिमित्रांमध्ये रोष निर्माण झाला आहे. घोडबंदर येथील वाघबीळ भागात शेजाऱ्यासोबत झालेल्या वादातून एका पाळीव श्‍वानाची हत्या करून त्याला जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हेही वाचा - भिवंडीतील सवाद येथे सुसज्ज कोव्हिड रुग्णालय; पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी 

विक्की ऊर्फ धीरज संतोष रेड्डी (26) असे अटक आरोपीचे नाव आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड कासारवडवली येथील किंगकॉंग नगर येथे राहणारे ललित मलिक हे आपल्या लहान भावास घेऊन जात असताना तेथे उभा असलेल्या गाडीवरील झेंड्याला चुकून हात लागल्याच्या कारणावरून विक्की रेड्डी याने हाताने चापटी मारत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच रात्री 1.30 च्या सुमारास घराच्या बाहेर फिरणारा कुत्रा विक्कीवर भुंकल्याने त्याचा राग येऊन कुत्र्यास जखमी करून जीवे ठार मारीत जाळून टाकीत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच हातातील चाकूचा धाक दाखवत शेजारील रहिवाशांसह गल्लीत जमलेल्या नागरिकांच्या अंगावर धावत जावून जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा - लव्ह जिहाद विरोधी कायदा करा; मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेण्याचे भाजपचे आवाहन

या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपी विक्कीला अटक करण्यात आली आहे. विक्की हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्याविरोधात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव दिल्याची माहिती कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली. 

Killed and burnt dog in Thane Anger in animal lovers due to action

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Killed and burnt dog in Thane Anger in animal lovers due to action